Delhi Murder : दिल्लीच्या ज्योती नगरमध्ये एका तरुणीला तिच्याच ओळखीच्या व्यक्तीने पाचव्या मजल्यावरून ढकलून दिल्याने तिचा मृत्यू झाला. नेहा नावाच्या या तरुणीला तौफिक नावाचा तरुण लग्नासाठी त्रास देत होता आणि तिच्या नकारामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

दिल्ली: दिल्लीच्या ज्योती नगरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे, जिथे 'भाईजान' मानलेल्या तौफिकने आपल्याच बहिणीसारख्या नेहाला पाचव्या मजल्यावरून ढकलून दिले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या १९ वर्षीय नेहाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, पोलीस तौफिकचा शोध घेत आहेत.

तौफिक आणि नेहाची ओळख सुमारे तीन वर्षांपासून होती. नेहा त्याला आपला भाऊ मानत असे आणि त्याला राखीही बांधत होती. मात्र, काही काळापासून तौफिकची नियत फिरली. तो नेहाशी लग्न करण्यासाठी हट्ट करत होता. नेहाला हे नातेसंबंध मान्य नव्हते आणि तिने त्याला विरोध केला. हा विरोध तौफिकला सहन झाला नाही, आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले.

'नेहाच्या गळ्यावर खुणा होत्या'

नेहाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, तौफिक बुरखा घालून इमारतीमध्ये आला होता. त्याने ओढणीने नेहाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या लोकांना आरडाओरडा ऐकू येऊ लागताच, त्याने नेहाला पाचव्या मजल्यावरून खाली ढकलले. नेहाच्या किंकाळ्या ऐकू आल्या, पण दुर्देवाने ते पहिल्या मजल्यावर असल्याने त्यांना लगेच कळले नाही. नेहाला रुग्णालयात नेले असता तिच्या गळ्यावर खुणा स्पष्ट दिसत होत्या. “या प्रकरणामुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. पोलिसांनी तौफिकला लवकरात लवकर पकडून कठोर कारवाई करावी,” असे नेहाच्या आईने सांगितले.

तौफिक देत होता धमकी

नेहाच्या वडिलांनी सांगितले की, तौफिक तिच्यावर बोलण्यासाठी दबाव टाकत होता, पण ती त्याच्या त्रासाला कंटाळली होती आणि त्याच्याशी बोलू इच्छित नव्हती. तो नेहाला धमक्याही देत असे. पोलिसांनी ज्योती नगर पोलिस ठाण्यात कलम 109(1)/351(2) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपी तौफिक हा मुरादाबादचा रहिवासी असून, तो सध्या फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत.

नेहाच्या मृत्यूनंतर परिसरात संताप

नेहाच्या या दुःखद मृत्यूनंतर संपूर्ण परिसरात तीव्र संतापाचे वातावरण आहे. यामुळे कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी परिसरात पोलीस आणि निमलष्करी दल (paramilitary forces) तैनात करण्यात आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, मृत नेहाचा मृतदेह कडेकोट बंदोबस्तात घरातून थेट स्मशानभूमीत नेण्यात आला. अंत्ययात्रेतही लोकांनी घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला.