डेहराडूनमध्ये दिवाळीच्या रात्री दोन गटांतील वादानंतर १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचा दावा केला जात होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर वेगळेच सत्य उघड झाले आहे. मित्रानेच भरधाव वेगात कार मागे घेताना या मुलाला चिरडल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

डेहराडूनमध्ये दिवाळीच्या रात्री दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या घटनेनंतर १५ वर्षीय मुलाच्या मृत्यूने आता वेगळेच वळण घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर मित्रानेच भरधाव वेगात कार मागे घेताना या मुलाला चिरडल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोमवारी पहाटे ही घटना घडली. सुरुवातीला मुलाला बेदम मारहाण केल्याचा आरोप होता. पीडित मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह इतरांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. मुलाच्या मित्रांनी रुग्णालयात त्याची ओळख लपवून त्याला सोडून दिल्याचे वडिलांनी म्हटले आहे.

मंगळवारी समोर आलेल्या ५५ सेकंदांच्या एका सीसीटीव्ही व्हिडिओत धक्कादायक घटना उघड झाली आहे. मित्र घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना कार मागे घेताना हा मुलगा गाडीखाली चिरडला गेला.

Scroll to load tweet…

अर्श अन्सारी असे मृत मुलाचे नाव आहे. तो दून ब्लॉसम स्कूलमध्ये दहावीत शिकत होता. त्याचे वडील नदीम अन्सारी यांचे डेहराडूनमध्ये मोबाईल आणि कॉम्प्युटरचे दुकान आहे. अर्श हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता.

रविवारी रात्री अर्श हा त्याच्या मित्राच्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी गेला होता. नेहरू कॉलनी भागात ते होते. पहाटे ३ च्या सुमारास ते कारने बाहेर पडले. रेसकोर्सजवळ सुरी चौकात त्यांचा दुसऱ्या गटाशी वाद झाला. जुन्या वादातून ही भांडणे सुरू झाल्याची माहिती आहे.

मित्राच्या गाडीखाली चिरडला गेला अर्श

धर्मपूर चौकातील अग्रवाल बेकरी जवळ हा वाद वाढला. तिथेच अर्श चिरडला गेल्याची माहिती आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन गट एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. वाद वाढल्याने अर्शचे मित्र कारजवळ आले आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते.

एका मुलाने घाईघाईत कार मागे घेतली. यावेळी अर्श कारच्या मागे उभा होता. कारची धडक बसल्याने तो खाली पडला आणि कारचे मागील चाक त्याच्या अंगावरून गेले. यापूर्वी झालेल्या मारहाणीत त्याला काही दुखापत झाली होती का? याचा तपास पोलीस करत आहेत.

अर्शने कारचा दरवाजा उघडताना एका मुलाला चुकून धडक लागली. त्यातून हा वाद सुरू झाल्याचा दावा अर्शच्या वडिलांनी केला. अर्शने मुद्दाम धक्का दिल्याचे सांगत त्या मुलाने मित्रांना बोलावून अर्शला मारहाण केल्याचेही त्यांनी सांगितले.

नदीम अन्सारी यांनी म्हटले, "माझ्या मुलाला इतकी बेदम मारहाण केली की त्याला रक्तस्राव सुरू झाला. सोमवारी सकाळी ६ च्या सुमारास मला त्याच्या एका मित्राच्या आईचा फोन आला. अर्श मृत अवस्थेत रुग्णालयात असल्याचे तिने सांगितले. मी तातडीने तिथे पोहोचलो. त्याच्या शरीरावर मारहाणीचे व्रण होते. मला माझ्या मुलासाठी न्याय हवा आहे. तो रविवारी रात्री नेहरू कॉलनीमध्ये मित्राकडे गेला होता."

रविवारी रात्री ९ वाजता नदीम यांचे त्यांच्या मुलासोबत शेवटचे बोलणे झाले होते. अर्शच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. पण, रस्त्यावर एक अनोळखी व्यक्ती जखमी अवस्थेत सापडल्याचे त्यांनी खोटे सांगितले. शिवाय कुटुंबाला कोणतीही माहिती न देता ते तिथून निघून गेले, असा आरोप नदीम यांनी केला.

या सर्व प्रकरणात ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी वडिलांनी केली आहे.

सीसीटीव्ही आणि वैद्यकीय पुराव्यांची पोलिसांकडून तपासणी

सिटी एसपी शेखर सुयाल यांनी म्हटले आहे की, प्राथमिक तपासात हा खून असल्याचे दिसत नाही. मात्र, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास करत आहेत.

अर्शचा मृत्यू मारहाणीमुळे झाला की कारखाली चिरडल्यामुळे? हे पोस्टमार्टम आणि न्यायवैद्यक अहवालावरून स्पष्ट होणार आहे.

सर्कल ऑफिसर (दालनवाला) नितीन लोहानी यांनी सांगितले की, वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह इतरांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे.

लोहानी म्हणाले, "आम्ही सीसीटीव्ही फुटेजसह सर्व बाबींचा तपास करत आहोत. यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल."

गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. पळून जाण्याच्या प्रयत्नात चुकून अर्श कारखाली आला का? हे तपासले जात आहे.