सार
अकोला शहरातील एका पोलीस हवालदाराने तक्रार करण्यासाठी आलेल्या एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संबंधित तक्रार महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
अकोला : शहरातील एका पोलीस हवालदाराने तक्रार करण्यास आलेल्या एका महिलेला शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अकोला जिल्ह्यातल्या चान्नी पोलीस स्टेशनचे हवालदार बाळकृष्ण येवले यांनी एका गावातील महिलेला शरीर सुखाची मागणी करून तिचा विनयभंग केला आहे. अशी तक्रार संबंधित महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. या घटनेनंतर कुंपणानेच शेत खाल्ले तर दाद मागावी तरी कुणाकडे असा प्रश्न सर्वसामान्यकडून उपस्थित केला जातो आहे. इतकेच नव्हे तर हवालदार येवले यांनी महिलेच्या मोबाईलवर सतत फोन करुन त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचा आरोपही या महिलेकडून करण्यात आला आहे.
सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय' हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. पोलीस हे नागरिकांच्या रक्षणासाठी असतात, त्यांचं संरक्षण करणं हे त्यांच प्रथम कर्तव्य असतं. हाच विश्वास दर्शवत सर्वसामान्य नागरिक प्रथम न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे धाव घेत असतात. मात्र, अकोला शहर पोलिसांना नेमकं झालंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित करण्यामागे कारण ठरतय ते सतत घडणारे धक्कादायक प्रकार. काही दिवसांपूर्वीच शहरातील एका बड्या डॉक्टरविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला अकोला पोलिसांनी (Akola Police) तब्बल चार दिवस तक्रार न घेता रात्री उशिरापर्यंत ताटकळत ठेवलंय. असा आरोप एका महिलेने केला होता. हे प्रकरण ताजे असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.