Inspirational Story : धीरूभाई अंबानींचे संपूर्ण कुटुंब 1BHK फ्लॅटमध्ये राहते होते, पगार होता केवळ 300 रुपये
Dhirubhai Ambani Birth Anniversary : रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचा आज जन्मदिवस आहे. स्वबळावर त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना कशी केली? याबाबतची प्रेरणादायी कहाणी आपण जाऊन घेऊया…
Harshada Shirsekar | Published : Dec 28, 2023 4:08 PM / Updated: Dec 28 2023, 04:23 PM IST
Dhirubhai Ambani Birth Anniversary : रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचा आज जन्मदिवस आहे. 28 डिसेंबर 1932 रोजी धीरूभाई यांचा जन्म झाला आणि 6 जुलै 2002 रोजी त्यांचे निधन झाले होते.
रिलायन्स इंडस्ट्रीजची स्वबळावर स्थापना करणाऱ्या धीरूभाई यांची कहाणी खूपच प्रेरणादायी आहे. देशातील प्रसिद्ध उद्योगपतींच्या यादीमध्येही त्यांच्या नावाचा समावेश होता. धीरूभाई यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया…
धीरूभाई अंबानी यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास
रिलायन्स इंडस्ट्रीजचा पाया रचणारे धीरूभाई अंबानी यांचे संपूर्ण नाव धीरजलाल हिराचंद अंबानी असे आहे. त्यांचे वडील हिराचंद हे प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी धीरूभाई यांच्याकडे कोणतेही आर्थिक पाठबळ नव्हते तसेच वडिलोपार्जित संपत्तीही नव्हती.
वर्ष 1948मध्ये वयाच्या 16व्या वर्षी धीरूभाई अंबानी आपले मोठे भाऊ रमणिकलाल यांच्या मदतीने येमेनमधील एडन येथे नोकरी करण्यासाठी पोहोचले. येथील एका कंपनीमध्ये मासिक 300 रुपये पगाराची नोकरी त्यांना मिळाली. वर्ष 1950मध्ये त्यांनी येमेनमधील अरब मर्चंटमध्येही काम केले.
एक वेळ अशी आली की धीरूभाईंनी नोकरी सोडून काहीतरी मोठे व वेगळे करण्याचा विचार केला. आपले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ते वर्ष 1954मध्ये मायदेशी परतले. यावेळेस आपल्यासोबत फक्त 500 रुपये घेऊन ते मुंबईत आले.
धीरूभाई अंबानी यांनी चुलत भाऊ चंपकलाल दिमानी यांच्या मदतीने रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन कंपनी स्थापन केली. ज्याद्वारे त्यांनी परदेशामध्ये आले, हळद व अन्य मसाले निर्यात करण्यास सुरुवात केली.
पाहता-पाहता धीरूभाई अंबानी यांना व्यवसायात यश मिळाले आणि ते कोट्यधीश झाले. जगभरात ‘धीरूभाई अंबानी’ हे नाव प्रसिद्ध झाले. रिपोर्ट्सनुसार, वर्ष 1958मध्ये त्यांनी पॉलिएस्टर धाग्यांचा निर्यात-आयातीचा व्यवसाय 50 हजार रुपयांच्या मदतीने सुरू केला. त्या काळात आशियामध्ये पॉलिएस्टर धाग्यांना प्रचंड मागणी होती, त्यामुळे त्यांच्या व्यवसायातील नफ्यामध्ये अनेक पटींनी तसेच झपाट्याने वाढ झाली.
वर्ष 1958 मध्येच 15 हजार रुपयांची गुंतवणूक वाढवून त्यांनी रिलायन्स कमर्शिअल कॉर्पोरेशन या नावाने कार्यालय उघडले. या कार्यालयात केवळ एक टेबल, दोन खुर्च्या, एक पेन, एक इंकपॉट, एक रायटिंग पॅड, एक पिण्याच्या पाण्याचे माठ आणि एक ग्लास इतक्याच गोष्टी होत्या.
काही काळानंतर त्यांनी अहमदाबादमधील नरोडा येथे कापड गिरणी सुरू केली आणि याद्वारे त्यांनी विमल नावाचे ब्रँड सुरू केले. आपले मोठे भाऊ रमणिकलाल अंबानी यांचा मुलगा विमल अंबानी यांचे नाव धीरूभाईंनी कंपनीला दिले.
वर्ष 1977मध्ये धीरूभाई अंबानी यांनी आपला IPO बाजारात आणला. यामध्ये 58 हजारहून अधिक गुंतवणूकदारांनी सहभाग नोंदवला. शेअर बाजारात दलालांनी त्यांना खूप त्रास दिला, पण त्यांच्यासमोर कोणीही टिकले नाहीत आणि पुढे तीन दिवस शेअर मार्केट बंद राहिले.
रिलायन्सच्या शेअर्सचे भाव खूप वाढले. धीरूभाई अंबानींपुढे दलालांना झुकावे लागले. 90चे दशक येता-येता त्यांच्यासोबत तब्बल 24 लाख गुंतवणूकदार जोडले गेले, तेव्हा रिलायन्स हा एक मोठा ब्रँड म्हणून उदयास आला.
चांगली कमाई होत असतानाही धीरूभाई अंबानी आपली पत्नी कोकिलाबेन व मुलांसह जवळपास 10 वर्षे केवळ वन बीएचके फ्लॅटमध्ये राहत होते.