आता सकाळी ९ ते ६ ची नोकरी करायची गरज नाही. पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. एका महिलेने अवघ्या सात महिन्यांत कोटी रुपये कमावले आहेत.

वॉशिंग्टन : सोशल मीडिया आजकाल केवळ छंद राहिलेला नाही. तो एक व्यवसाय बनला आहे. अनेकांनी कंटेंट क्रिएशन हे करिअर म्हणून निवडलं आहे. त्यातून ते कोट्यवधी रुपये कमवत आहेत. सारा अॅन ही त्याचं एक उत्तम उदाहरण आहे.

सात महिन्यांत १.७५ कोटींची कमाई

अमेरिकेतील सारा अॅन (Sarah Ann) ही महिला नर्स म्हणून काम करत होती. फावल्या वेळेत ती सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करत असे. केवळ सात महिन्यांत सोशल मीडिया व्हिडिओ आणि ब्रँड डील्सच्या माध्यमातून तिने तब्बल १.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या यशानंतर तिने नर्सच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ती पूर्णवेळ कंटेंट क्रिएटर बनली आहे.

जवळपास दीड वर्ष नर्सचं काम करत असतानाच सारा सोशल मीडियावर व्हिडिओ बनवत होती. तिचे दैनंदिन जीवन, कामाचे अनुभव आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी ती व्हिडिओद्वारे शेअर करत असे. सुरुवातीला आपले व्हिडिओ कोण बघेल, अशी शंका तिला वाटायची. एक नर्स आणि सिंगल मदर असलेल्या तिच्या आयुष्याबद्दल लोकांना रस असेल का, असा प्रश्न तिला पडायचा. मात्र जसे दिवस गेले तशी तिच्या व्हिडिओंची व्ह्यूअरशिप वाढू लागली. त्यामुळे ब्रँड्सचं लक्षही तिच्याकडे वेधलं गेलं. मे महिन्यात तिला पहिली ब्रँड डील मिळाली. त्यानंतर एकापाठोपाठ एक अनेक ब्रँड्ससोबत काम करण्याची संधी तिला मिळाली.

सारा अॅनने तिच्या व्हिडिओमध्ये कंटेंट क्रिएशनमधून कमावलेल्या पैशांचा संपूर्ण हिशोब शेअर केला आहे. मे ते नोव्हेंबर या कालावधीत ब्रँड पार्टनरशिप्सद्वारे तिला एकूण १,८७,७८५ डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे १.७५ कोटी रुपयांचे करार मिळाले आहेत. विशेष म्हणजे ही रक्कम केवळ ब्रँड डील्समधून आली आहे. डिजिटल प्रॉडक्ट्स, सोशल मीडिया व्ह्यूज आणि एफिलिएट लिंक्समधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा यात समावेश नाही. मात्र, ही सर्व रक्कम तिच्या हातात आलेली नाही. ब्रँडसोबत करार करण्यात मदत करणाऱ्या एजन्सीला कमिशन द्यावं लागतं. तसंच टॅक्स भरण्यासाठी काही रक्कम बाजूला ठेवावी लागते.

सारा अॅनच्या मते, एजन्सीचं कमिशन आणि टॅक्ससाठी २५ ते ३५ टक्के रक्कम बाजूला काढल्यानंतर तिच्याकडे ८८,०७१ डॉलर्स म्हणजेच सुमारे ८२ लाख रुपये उरले आहेत. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, फक्त सात महिन्यांचं कंटेंट क्रिएशनचं उत्पन्न हे तिच्या वर्षभराच्या नर्सच्या पगारापेक्षाही जास्त होतं. म्हणूनच तिने नर्सची नोकरी सोडून पूर्णवेळ कंटेंट क्रिएशनमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.