US Deploys Worlds Largest Aircraft Carrier to Middle East : इराणसोबतच्या अणुकरार चर्चेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दबाव वाढवला आहे. जगातील सर्वात मोठी विमानवाहू नौका जेराल्ड आर. फोर्डला पश्चिम आशियामध्ये पाठवण्यात आले आहे. 

US Deploys Worlds Largest Aircraft Carrier to Middle East : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील दबाव वाढवला आहे. इराणला लक्ष्य करत दुसरी युद्धनौका पाठवण्यात आली आहे. इराणसोबत अणुकरारावर एकमत न झाल्यास या युद्धनौकेची गरज पडेल, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली. एकमत झाल्यास ती मागे घेता येईल, असेही ट्रम्प म्हणाले. जगातील सर्वात मोठी विमानवाहू नौका 'जेराल्ड आर. फोर्ड' आता पाठवण्यात येत आहे. यापूर्वी 'अब्राहम लिंकन' ही नौका पश्चिम आशियामध्ये पाठवण्यात आली होती.

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मदुरो यांना पकडण्याच्या मोहिमेचा भाग असलेली हीच 'जेराल्ड आर. फोर्ड' नौका आहे. ही नौका ६० लढाऊ विमानांसह एकूण ७५ विमाने वाहून नेऊ शकते. अमेरिकेच्या विशेष दूताने इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत ओमानमध्ये केलेल्या चर्चेत विशेष प्रगती झालेली नाही. एका महिन्यात करार झाला नाही, तर प्रतिक्रिया दिली जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

नेतान्याहू यांनी व्यक्त केली शंका

सध्या दोन्ही देशांनी चर्चा पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पुढील चर्चेची तारीख किंवा ठिकाण अद्याप ठरलेले नाही. दरम्यान, इराणविरोधात कठोर करार करावा या मागणीसाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गेल्या दिवशी व्हाईट हाऊसमध्ये भेट दिली होती. इराणसोबतच्या चर्चेत एकमत होईल की नाही, याबाबत नेतान्याहू यांनी शंका व्यक्त केली. ट्रम्प यांनी आपले मत विचारले आणि आपण आपली भूमिका स्पष्ट केली, असे नेतान्याहू यांनी सांगितले.

ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये तीन तास बैठक चालली. इराणसोबतची अणुकरार चर्चा आणि पश्चिम आशियातील सुरक्षा परिस्थिती हे चर्चेचे मुख्य विषय होते. आपल्याला इराणसोबत राजनैतिक करार करायचा आहे, असे ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना सांगितले. इराणसोबत सध्या सुरू असलेली राजनैतिक चर्चा पुढे चालू ठेवण्याची भूमिका ट्रम्प यांनी घेतली. इराण-अमेरिका चर्चेत एकमत होईल की नाही, याबाबत नेतान्याहू यांनी शंका व्यक्त केली.