Trump Praises Modi at Davos : दावोस येथील जागतिक आर्थिक मंचावर, भारतासोबत लवकरच एक चांगला व्यापार करार होईल, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. पंतप्रधान मोदींची प्रशंसा करताना त्यांनी 'अमेरिका फर्स्ट' धोरणाचा पुनरुच्चारही केला.
Trump Praises Modi at Davos : भारतासोबत लवकरच एक चांगला व्यापार करार होईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावोसमध्ये म्हटले आहे. यासाठी चर्चा चांगल्या प्रकारे सुरू असल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. नरेंद्र मोदी एक उत्तम नेते आणि जवळचे मित्र आहेत. मोदींबद्दल खूप आदर आहे. भारत-पाक युद्ध आपणच थांबवले, असे ट्रम्प यांनी दावोसमध्येही पुन्हा सांगितले. त्याचवेळी, स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जागतिक नेते आणि व्यावसायिक दिग्गजांच्या उपस्थितीत झालेल्या जागतिक आर्थिक मंचावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा 'अमेरिका फर्स्ट' धोरणाचा पुनरुच्चार केला.
ग्रीनलँड ताब्यात घेण्याची धमकी
ग्रीनलँड ताब्यात घेण्याची धमकी आणि युरोपीय देशांवरील टीका यामुळे त्यांचे यंदाचे भाषण चर्चेत राहिले. ग्रीनलँड हा खरं तर उत्तर अमेरिकेचा भाग आहे आणि त्यामुळे ती 'अमेरिकेची भूमी' आहे, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली. अमेरिकेला ग्रीनलँड खरेदी करण्याची इच्छा आहे, परंतु ते ताब्यात घेण्यासाठी लष्करी बळाचा वापर करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
"तुम्ही हे मान्य करू शकता, तसे केल्यास आम्ही त्याचे कौतुक करू. किंवा तुम्ही 'नाही' म्हणू शकता, आणि आम्ही ते लक्षात ठेवू," असा इशारा ट्रम्प यांनी युरोपीय देशांना आणि डेन्मार्कला दिला. युरोप योग्य दिशेने जात नाहीये, असे ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले. अनेक युरोपीय देश आज ओळखताही येणार नाहीत इतके बदलले आहेत आणि हा एक नकारात्मक बदल आहे, असा टोमणाही त्यांनी मारला. व्यावसायिक नेत्यांमध्ये माझे 'मित्र आणि काही शत्रू' आहेत, असे म्हणत त्यांनी भाषणाला सुरुवात केली.
ग्रीनलँडला 'एक सुंदर मोठा बर्फाचा तुकडा' असे संबोधत ट्रम्प यांनी सामरिक सुरक्षेसाठी ग्रीनलँड अमेरिकेचा भाग असणे आवश्यक असल्याचे म्हटले. दुसऱ्या महायुद्धानंतर ग्रीनलँडला डेन्मार्कला परत करण्याचा अमेरिकेचा निर्णय 'मूर्खपणाचा' होता, असेही ते म्हणाले. अमेरिकेच्या मदतीमुळेच कॅनडा टिकून आहे, असे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांना उद्देशून ट्रम्प म्हणाले. त्यांनी कॅनडाला अमेरिकेचे आभार मानण्यास सांगितले.


