बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (BNP) कार्यकारी अध्यक्ष आणि झिया कुटुंबाचे वारस, तारीक रहमान, लंडनमधील 17 वर्षांचा वनवास संपवून मायदेशी परतले आहेत. तारीक रहमान यांचे पुनरागमन बांगलादेशच्या राजकारणावर महत्त्वपूर्ण परिणाम करेल, असा अंदाज आहे.
ढाका : बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (BNP) कार्यकारी अध्यक्ष आणि झिया कुटुंबाचे वारस, तारीक रहमान, लंडनमधील 17 वर्षांचा वनवास संपवून मायदेशी परतले आहेत. तारीक रहमान यांचे पुनरागमन बांगलादेशच्या राजकारणावर महत्त्वपूर्ण परिणाम करेल, असा अंदाज आहे. निवडणुकीच्या तोंडावर ते मायदेशी आले आहेत. त्यांच्यासोबत पत्नी डॉ. झुबैदा रहमान आणि मुलगी झायमा यादेखील होत्या. एकेकाळी तारीक रहमान बांगलादेशचे 'डार्क प्रिन्स' म्हणून ओळखले जात होते. BNP सरकारच्या काळात भ्रष्टाचार आणि अधिकाराचा गैरवापर केल्याच्या आरोपांमुळे त्यांना 'डार्क प्रिन्स' हे नाव मिळाले.
तारीक रहमान यांचे वडील झियाउर रहमान यांची बांगलादेशचे राष्ट्रपती असताना हत्या झाली होती. खालेदा झिया यांची प्रकृती खालावलेली असताना, परतलेले तारीक रहमान बांगलादेशच्या नेतृत्वाची धुरा सांभाळण्याचे ध्येय बाळगून आहेत. आजारी असलेल्या माजी पंतप्रधान खालेदा झिया यांचे 60 वर्षीय मोठे पुत्र रहमान आज ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आईला भेटण्यापूर्वी ते विमानतळावरून थेट स्वागत समारंभाला जातील, असे पक्षाने कळवले आहे. तारीक यांच्या पुनरागमनाने बांगलादेशच्या राजकारणाचा इतिहास बदलेल, असे BNP नेत्यांनी म्हटले आहे.
इन्किलाब मंच या सांस्कृतिक गटाचे नेते आणि गेल्या वर्षीच्या सरकारविरोधी आंदोलनातील प्रमुख व्यक्ती, शरीफ उस्मान हादी यांचा सिंगापूरमधील रुग्णालयात मृत्यू झाल्याने देशात अशांतता असताना रहमान यांचे पुनरागमन झाले आहे.
5 ऑगस्ट 2024 रोजी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी पलायन केले होते. हसीना यांचा पक्ष अवामी लीगला निवडणूक लढवण्यास बंदी घातल्याने, फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत BNP हा प्रमुख पक्ष बनला आहे. सर्वेक्षणांनुसार BNP सत्तेत येईल, असे म्हटले जात आहे. तसे झाल्यास तारीक रहमान महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

तारीक रहमान विमानतळावर पोहोचले तेव्हा
भारतासोबतच्या संबंधांचे भविष्य -
रहमान यांचे बांगलादेशात पुनरागमन भारतासाठी महत्त्वाचे आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालेदा झिया यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. तर सध्याच्या अंतरिम सरकारशी भारताचे संबंध चांगले नव्हते. शिवाय, अंतरिम सरकारने पाकिस्तान आणि चीनशी जवळीक वाढवली होती. रहमान यांचा पक्ष BNP सोबत भारताचे संबंध पूर्वी फारसे चांगले नसले तरी, BNP ने पाकिस्तानपासूनही अंतर ठेवले होते. तारीक रहमान यांना परत आणण्यामागे पाकिस्तान आणि चीनची संयुक्त खेळी असल्याचा भारताला संशय आहे. शेख हसीना यांच्या पक्षाच्या अनुपस्थितीत कोणतीही निवडणूक योग्य ठरणार नाही, या भूमिकेवर भारत ठाम आहे. दरम्यान, भारतासोबतचे संबंध सुधारण्याची अंतरिम सरकारची घोषणा प्रामाणिक आहे का, यावर केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. हत्या झालेल्या हिंदू तरुण दिपू चंदरदास यांच्या कुटुंबाचे संरक्षण करू, अशी घोषणा अंतरिम सरकारचे नेतृत्व करणारे मोहम्मद युनूस यांनी काल केली होती.
2001-2006 या काळात BNP चा मित्रपक्ष असलेला कट्टर इस्लामिक गट जमात-ए-इस्लामी, आगामी सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. अवामी लीगवर सध्या निवडणुकीतून बंदी घातल्यामुळे, भारत BNP ला एक लोकशाही भागीदार म्हणून पाहू शकतो. भारत किंवा पाकिस्तान नव्हे, तर बांगलादेशला आपले प्रथम प्राधान्य असेल, असे तारीक रहमान यांनी पूर्वी म्हटले होते. तथापि, हसीना यांना आश्रय देण्याच्या भारताच्या निर्णयाकडे तारीक रहमान कसे पाहतात, हे देखील महत्त्वाचे ठरेल.


