हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून, अनेकांनी त्यावर चिंता आणि कौतुक अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

इस्लामाबाद / रावळपिंडी : पाकिस्तानात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. अशाच एका घटनेत, चाहन धरणाजवळ थेट प्रसारण करत असताना एका पत्रकाराला जोरदार पाण्याच्या प्रवाहाने वाहून नेले, आणि हा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यावर कैद झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून, अनेकांनी त्यावर चिंता आणि कौतुक अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

थेट कव्हरेज दरम्यान दुर्दैवी घटना

ही घटना रावळपिंडीजवळच्या चाहन धरणाजवळ घडली. संबंधित पत्रकार गळ्यापर्यंत पाण्यात उभा राहून थेट प्रसारण करत होता. त्याच्या हातात माईक होता, आणि तो पावसामुळे उद्भवलेल्या पुरस्थितीबद्दल माहिती देत होता. तेवढ्यात पाण्याचा जोर वाढला आणि अचानक पत्रकाराचा तोल सुटून तो पाण्यात बुडू लागला. व्हिडीओमध्ये शेवटपर्यंत त्याचे फक्त डोके आणि माईक दिसत होते, आणि काही क्षणांतच तो पूर्णतः प्रवाहात गडप झाला.

समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया

हा थरारक व्हिडीओ 'अल अरबीया इंग्लिश'ने फेसबुकवर शेअर केला आणि त्यानंतर तो व्हायरल झाला. अनेकांनी पत्रकाराच्या धाडसाचं कौतुक केलं, तर काहींनी अशा धोकादायक परिस्थितीत रिपोर्टिंग करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “पत्रकारिता ही माहिती देण्याचं माध्यम आहे, जीव धोक्यात घालण्याचं नव्हे,” असे काहींचे म्हणणे होते. तर इतरांनी “धोक्याच्या प्रसंगीही आपली जबाबदारी निभावणं हेच खरं पत्रकारितेचं ध्येय आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.

Scroll to load tweet…

पूरस्थितीचं भयावह चित्र: ११६ मृत, लाखो लोक बाधित

२६ जूनपासून पाकिस्तानात सतत मुसळधार पावसामुळे पूरस्थितीने थैमान घातले आहे. आतापर्यंत ११६ लोकांचा मृत्यू झाला असून, २५० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

प्रांतानुसार मृतांचा तपशील असा आहे:

पंजाब: ४४ मृत्यू

खैबर पख्तुनख्वा: ३७ मृत्यू

सिंध: १८ मृत्यू

बलुचिस्तान: १९ मृत्यू

पाकव्याप्त काश्मीर (PoK): १ मृत्यू, ५ जखमी

पूरामुळे हजारो घरे उद्ध्वस्त झाली असून, लाखो नागरिक विस्थापित झाले आहेत. शेती, रस्ते आणि वीजपुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला आहे.

प्रशासनाची अपुरी तयारी?

पूरग्रस्त भागांमध्ये मदत कार्य सुरु असले तरी अनेकांनी प्रशासनाच्या तयारीवर टीका केली आहे. वाऱ्यावर सोडलेली नियोजनशून्यता, मदतीचा अपुरा वेग आणि आपत्कालीन यंत्रणांचा उशिरा प्रतिसाद, यामुळे जनतेच्या मनात रोष आहे.