Mojtaba Khamenei Secretly Appointed Irans New Supreme Leader : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर, त्यांचा मुलगा मुज्तबा खामेनी यांची गुप्तपणे देशाच्या सर्वोच्च नेतेपदी निवड झाली आहे. लष्कराच्या पाठिंब्यामुळे ही निवड झाली असली तरी, घराणेशाहीचा आरोप होत आहे.

Mojtaba Khamenei Secretly Appointed Irans New Supreme Leader : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर आता त्यांचे पुत्र मुज्तबा खामेनी देशाचे नवे सर्वोच्च नेते बनले आहेत. ५५ वर्षीय मुज्तबा हे खामेनी यांचे दुसरे पुत्र आहेत. विशेष म्हणजे, ते कधीही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा अधिकृत पदावर दिसले नाहीत, पण गेल्या अनेक दशकांपासून पडद्याआड राहून त्यांनी इराणच्या राजकारणात मोठा दबदबा निर्माण केला होता. ते अयातुल्ला खामेनी यांच्या कार्यालयाचे नियंत्रण करायचे आणि अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा शब्द अंतिम मानला जायचा. इराणच्या 'रिव्होल्युशनरी गार्ड्स'सोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत. याच कारणामुळे सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत त्यांची नेतेपदी निवड झाल्याचं मानलं जातंय.

अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यात अली खामेनी मारले गेल्यानंतर इराण मोठ्या संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत मुज्तबा यांची निवड झाली आहे. १९७९ च्या क्रांतीनंतर इराणच्या सर्वोच्च पदावर झालेली ही पहिलीच 'घराणेशाही' आहे. त्यामुळे देशात आणि परदेशातही या निवडीवरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. कारण परंपरेनुसार, या पदासाठी नेहमी ज्येष्ठ धर्मगुरूंचाच विचार केला जातो.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या निवडीला विरोध केला आहे. 'इराणचा नवा सर्वोच्च नेता आम्हाला मान्य नाही, आमच्या पसंतीचा नेता तिथे असायला हवा,' असं ट्रम्प म्हणाले होते. पण, 'आमच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणी ढवळाढवळ करू नये,' असं प्रत्युत्तर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलं. दरम्यान, पश्चिम आशियातील संघर्ष अजूनही सुरूच आहे. आणखी एका अमेरिकन सैनिकाचा मृत्यू झाल्याची बातमी असून, मृतांचा आकडा आता ७ वर पोहोचला आहे. दुसरीकडे, इराणचे माजी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचंही वृत्त आहे, पण ते सुरक्षित असल्याचं समजतंय. आता मुज्तबा यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम आशियातील युद्धाला कोणतं वळण मिळतं, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.