Dubai Authorities Release Guidelines for Emergency:संयुक्त अरब अमिरातीमध्ये फोनवर इमर्जन्सी अलर्ट आल्यास कोणती सुरक्षा काळजी घ्यावी, याबद्दल सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांनी इमारतींमध्ये सुरक्षित ठिकाणी जावे, फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा आणि 'ऑल क्लिअर'चा मेसेज येईपर्यंत बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Dubai Authorities Release Guidelines for Emergency Phone Alerts: मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती पाहता, संयुक्त अरब अमिरातीसह (UAE) इतर आखाती देशांनी आपल्या नागरिकांसाठी आणि रहिवाशांसाठी अनेक सुरक्षा सूचना जारी केल्या आहेत. अबुधाबीमधील भारतीय दूतावासानेही सुरक्षेसंबंधी सूचना दिल्या होत्या. UAE ची हवाई संरक्षण यंत्रणा देशाच्या दिशेने येणारी मिसाइल आणि ड्रोन हल्ले यशस्वीपणे परतवून लावत आहे. अशा हल्ल्यांच्या वेळी लोकांच्या फोनवर इमर्जन्सी अलर्ट पाठवले जातात. हे अलर्ट आल्यावर नक्की काय करायचं, याबद्दल दुबई गव्हर्नमेंट मीडिया ऑफिसने सविस्तर माहिती दिली आहे.
देश पूर्णपणे सुरक्षित असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याची खात्री अधिकाऱ्यांनी दिली आहे. या मार्गदर्शक सूचनांचा उद्देश हा आहे की, मंत्रालयाकडून आपत्कालीन संदेश आल्यावर नागरिकांनी घाबरून न जाता शांतपणे परिस्थितीला सामोरे जावे. ज्यावेळी तुमच्या फोनवर अलर्ट येईल, तेव्हा तुम्ही घराबाहेर किंवा ऑफिसबाहेर असाल, तर त्वरित जवळच्या इमारतीत आश्रय घ्या. जर तुम्ही गाडी चालवत असाल, तर गाडी थांबवून जवळच्या सुरक्षित इनडोअर ठिकाणी जा.
मोकळ्या जागा, खिडक्या आणि बाल्कनीपासून दूर राहा. काचेच्या तावदानाजवळ किंवा बाहेरच्या भिंतींजवळ उभे राहू नका, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. अलर्ट आल्यावर घरात किंवा ऑफिसमध्ये असणाऱ्यांनी खिडक्या आणि बाल्कनीपासून दूर राहावे. इमारतीच्या आतील भागात, जो जास्त सुरक्षित असेल, तिथे थांबावे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही ऑडिओ किंवा व्हिडिओ मेसेजवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत आणि सरकारी सूत्रांकडून येणाऱ्या माहितीचेच पालन करा, असे आवाहन सरकारने पुन्हा एकदा केले आहे.
पुढील सूचना मिळेपर्यंत लिफ्टचा वापर करू नका. इमारतींमधील पब्लिक ॲड्रेस सिस्टीमद्वारे दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे लक्ष द्या. जोपर्यंत गृह मंत्रालयाकडून धोका टळल्याचा 'ऑल क्लिअर' मेसेज येत नाही, तोपर्यंत सुरक्षित ठिकाणीच थांबा. परिस्थिती पूर्वपदावर आल्याचा संदेश मिळाल्यानंतरच घराबाहेर पडा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, UAE ने मिसाइल आणि ड्रोन हल्ल्यांचा इशारा देणाऱ्या मोबाईल अलर्टच्या आवाजात बदल केला आहे. आता सकाळी ९ ते रात्री १०:३० या वेळेत मिसाइल हल्ल्याचा धोका असल्यास मोबाईलवर मोठा सायरन वाजेल. धोका टळल्यावर मात्र नॉर्मल मेसेज टोन येईल. रात्री १०:३० ते सकाळी ९ या वेळेत मोठा सायरन वाजणार नाही, फक्त नॉर्मल मेसेज टोन येईल. धोका टळल्याचा संदेशही नॉर्मल टोनमध्येच येईल. रात्रीच्या वेळी लोकांच्या झोपेत व्यत्यय येऊ नये, यासाठी अलर्ट टोनमध्ये हा बदल करण्यात आल्याचे राष्ट्रीय आपत्कालीन संकट आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (National Emergency Crisis and Disasters Management Authority) सांगितले.
UAE च्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणने हल्ले सुरू केल्यापासून १० मार्चपर्यंत २६२ बॅलिस्टिक मिसाइल डागण्यात आले. त्यापैकी २४१ मिसाइल UAE ने यशस्वीपणे नष्ट केले. १९ मिसाइल समुद्रात पडले, तर फक्त दोन मिसाइल देशाच्या हद्दीत पडले. याच काळात १,४७५ ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला, त्यापैकी १,३८५ ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आले. ९० ड्रोन देशाच्या वेगवेगळ्या भागांत पडले. याशिवाय, आठ क्रूझ मिसाइलदेखील UAE च्या संरक्षण मंत्रालयाने नष्ट केले.


