कंटेंट क्रिएटर्सना जास्त मोबदला देण्यास X ने सुरुवात केल्यास, व्हिडिओ स्ट्रीमिंगमधील यूट्यूबच्या वर्चस्वाला मोठे आव्हान मिळेल. तसे संकेत एलॉन मस्क यांनी दिले आहेत.
टेक्सास: कंटेंट क्रिएटर्सना यूट्यूबपेक्षा जास्त मोबदला लवकरच X वर दिला जाईल, असे संकेत मालक एलॉन मस्क यांनी दिले आहेत. X प्लॅटफॉर्मवर ओरिजनल कंटेंटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मस्क यांनी ही प्रतिक्रिया दिली. वापरकर्त्यांना योग्य मोबदला न देणारे प्लॅटफॉर्म कालबाह्य होतील, या वापरकर्त्यांच्या मतांनंतर एलॉन मस्क यांनी X च्या कमाईच्या मॉडेलबद्दल माहिती दिली. कंटेंट क्रिएटर्सना पैसे देण्याचा निर्णय X ने घेतल्यास, व्हिडिओ स्ट्रीमिंगमधील यूट्यूबच्या वर्चस्वाला ते एक मोठे आव्हान असेल.
X वरून कंटेंट क्रिएटर्सना पैसे कमावण्याची संधी
ऑनलाइन कंटेंट मोठ्या प्रमाणात लँग्वेज मॉडेल्सकडून वापरले जात असल्याने, कमाईची संधी देणारे प्लॅटफॉर्मच 'ओरिजनल कंटेंट' टिकवून ठेवू शकतील, अशी आशा एलॉन मस्क यांना आहे. प्लॅटफॉर्मचा गैरवापर करणाऱ्यांना पूर्णपणे वगळून कमाईचे मॉडेल लागू करावे, अशा सूचना एलॉन मस्क यांनी X च्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून, प्लॅटफॉर्मवर उच्च दर्जाचा आणि प्रामाणिक कंटेंट सुनिश्चित करण्यासाठी एक प्रणाली विकसित केली जात आहे, असे कंपनीच्या प्रॉडक्ट हेड निकिता बायर यांनी सांगितले. जास्त पैसे दिले जात असले तरी, मोबदला ठरवण्यावर आणि देण्यावर X प्लॅटफॉर्मचे कठोर नियंत्रण असेल हे निश्चित आहे. कृत्रिम एंगेजमेंट, बॉट-आधारित हस्तक्षेप आणि दिशाभूल करणारी माहिती टाळण्यासाठी X प्रयत्न करेल. ९९ टक्के फसवणूक करणाऱ्यांना काढून टाकले जाईल, अशी घोषणा निकिता बायर यांनी केली आहे.
X प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना कमी मोबदला देत असल्याचे एलॉन मस्क यांनी पूर्वी उघडपणे सांगितले होते. पैसे वेळेवर देता येत नसल्याचेही मस्क यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये मान्य केले होते. गुगलच्या मालकीचा असलेला यूट्यूब या बाबतीत खूप पुढे आहे, असेही एलॉन मस्क म्हणाले होते.


