हे भारतीय पोस्ट ऑफिस २४ तास पाण्यात! जगात एकमेव तरंगते पोस्ट ऑफिस,ते कसे चालते?
तुम्ही तरंगणारे तलाव आणि तरंगणाऱ्या बाजाराबद्दल ऐकलं असेल. पण तुम्ही कधी तरंगणाऱ्या पोस्ट ऑफिसबद्दल ऐकलं आहे का? जगात फक्त एकच तरंगणारं पोस्ट ऑफिस आहे. ते कुठे आहे माहित आहे का? जास्त विचार करू नका, ते भारतातच आहे.

अनोखी गोष्ट
जगात सर्वाधिक पोस्ट ऑफिस असलेल्या आपल्या देशातच ही अनोखी गोष्ट आहे. पृथ्वीवरील स्वर्ग म्हटल्या जाणाऱ्या काश्मीरमधील दल लेकमध्ये हे पोस्ट ऑफिस पत्र घेऊन तरंगत असतं.
पर्यटनात महत्त्वाची भूमिका
आज हे तरंगते पोस्ट ऑफिस काश्मीर पर्यटनात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. स्थानिकांपेक्षा येथे येणारे शेकडो देशी-विदेशी पर्यटकच या पोस्ट ऑफिसचा जास्त वापर करतात. घाट क्रमांक १४ आणि १५ दरम्यान नांगरलेले हे पोस्ट ऑफिस आज संग्रहालय म्हणूनही काम करते.
फ्लोटिंग पोस्ट ऑफिस
जगातील एकमेव तरंगत्या पोस्ट ऑफिसमधून आपल्या प्रियजनांना पोस्टकार्ड पाठवण्यासाठी अनेकजण येथे थांबतात. दल लेकला भेट देणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रशासनाने २०११ मध्ये नेहरू पार्क पोस्ट ऑफिसचे नाव बदलून फ्लोटिंग पोस्ट ऑफिस असे ठेवले.
तिकिटांवर दल लेकचं चित्र
पहिल्यांदा पाहिल्यावर ही एक सामान्य शिकारा बोट वाटू शकते. पण या हाऊसबोटमध्ये प्रवेश केल्यावर, आश्चर्यचकित करणारी वास्तुकला तुमचं स्वागत करते. येथील तिकिटांवर दल लेकचं चित्र आहे.
शहराची सुंदर रचना
येथून पोस्ट केलेल्या कार्डांवर दल लेक आणि श्रीनगर शहराची सुंदर रचना असते. याशिवाय, येथे एक फिलाटेली संग्रहालय आहे, ज्यात विशेष तिकिटांचा मोठा संग्रह आहे. तसेच एक स्मरणिका दुकानही आहे, जिथे पोस्टकार्ड, तिकिटे आणि स्थानिक वस्तू खरेदी करता येतात.
सर्वात जुना सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम
भारतीय पोस्ट हा भारतातील सर्वात जुना सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. आजची टपाल व्यवस्था १७४६ मध्ये, ब्रिटिश भारताचे संस्थापक लॉर्ड रॉबर्ट क्लाइव्ह यांच्या काळात अस्तित्वात आली. आज भारताची टपाल व्यवस्था जगातील सर्वात मोठी आणि सर्वोत्तम आहे. १,५५,४०० पोस्ट ऑफिसचा विक्रम फक्त भारताच्या नावावर आहे.
ग्रामीण भागात जास्त पोस्ट ऑफिस
भारतीय टपाल विभागात साडेपाच लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. आज भारताच्या ८८% भूभागावर टपाल व्यवस्था आहे. शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात जास्त पोस्ट ऑफिस आहेत.
तरंगणारं पोस्ट ऑफिस
या सगळ्यांपेक्षाही भारी गोष्ट म्हणजे तरंगणारं पोस्ट ऑफिस. त्यामुळे आता काश्मीरला भेट देताना, जगातील एकमेव तरंगत्या पोस्ट ऑफिसमधून तुमच्या प्रियजनांना दल लेकचं एक सुंदर पोस्टकार्ड नक्की पाठवा.

