क्रेडिट कार्डचं बिल आल्यावर फक्त 'मिनिमम ड्यू' भरणं तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटात ढकलू शकतं, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. यामुळे मूळ रक्कम तर कमी होत नाहीच, पण जास्त व्याज आणि सिबिल स्कोर खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे नेहमी पूर्ण बिल भरणंच फायद्याचं ठरतं.
मुंबई : क्रेडिट कार्डचं मोठं बिल आलं की अनेक जण 'मिनिमम अमाऊंट ड्यू' (Minimum Amount Due) म्हणजेच कमीत कमी रक्कम भरतात आणि उरलेलं बिल पुढच्या महिन्यावर ढकलतात. पण आर्थिक तज्ज्ञांच्या मते, ही सवय तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटात अडकवू शकते. सतत फक्त मिनिमम रक्कम भरल्याने तुमची मूळ रक्कम (Principal Amount) कमी होत नाही, उलट तुमच्यावर कर्जाचा डोंगर वाढत जातो.
पैशांची अडचण असताना बँक खातं डिफॉल्ट होऊ नये आणि लेट फी (Late Fee) वाचवावी, यासाठी हा पर्याय तात्पुरता ठीक आहे. पण नेहमीच याचा वापर करणं महागात पडू शकतं. तुम्ही जेव्हा पूर्ण बिल भरत नाही, तेव्हा क्रेडिट कार्डवर मिळणारा 'बिनव्याजी कालावधी' (Interest-free period) संपतो. याशिवाय, उरलेल्या रकमेवर दरमहा ३ ते ३.७५ टक्के इतकं भरभक्कम व्याज आणि त्यावर जीएसटी (GST) लावला जातो. एवढंच नाही, तर तुम्ही क्रेडिट कार्डवरून जी नवीन खरेदी कराल, त्यावरही पहिल्या दिवसापासून व्याज लागायला सुरुवात होते.
उदाहरणच द्यायचं झालं तर, समजा तुमच्या क्रेडिट कार्डचं बिल ५०,००० रुपये आहे आणि तुम्ही मिनिमम ड्यू म्हणून ३,००० रुपये भरले. तर या ३,००० रुपयांमधला मोठा हिस्सा फक्त व्याज आणि टॅक्स भरण्यातच जातो. तुमच्या मूळ ५० हजार रुपयांमधून जेमतेम १,००० रुपयेच कमी होतात. उरलेल्या मोठ्या रकमेवर पुन्हा व्याज लागतं आणि नवीन खर्चही त्यात जोडले जातात. यामुळे ग्राहकांचा आर्थिक बोजा आवाक्याबाहेर जातो.
सतत फक्त मिनिमम रक्कम भरल्याने तुमचा 'क्रेडिट युटिलायझेशन रेशिओ' (Credit Utilization Ratio) वाढतो. याचा थेट फटका तुमच्या सिबिल स्कोरला (CIBIL Score) बसतो आणि तो खराब होतो. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही सलग काही महिने पूर्ण बिल भरू शकत नसाल, तर तुम्ही एका मोठ्या आर्थिक जाळ्यात (Debt Trap) अडकत आहात, हे नक्की समजा.
या संकटातून वाचायचं असेल, तर नेहमी क्रेडिट कार्डचं पूर्ण बिल भरण्याची सवय ठेवा. जर एखाद्या वेळी पूर्ण बिल भरणं शक्य नसेल, तर सर्वात आधी क्रेडिट कार्डवरून नवीन खरेदी करणं थांबवा. तसेच, क्रेडिट कार्ड वापरून एटीएममधून (ATM) चुकूनही कॅश काढू नका, कारण त्यावर खूप जास्त व्याज आकारलं जातं, असा महत्त्वाचा सल्लाही आर्थिक तज्ज्ञांनी दिला आहे.
