IRCTC Train Ticket Booking : रेल्वेकडून तिकीट बुकिंग करण्यासाठी लागणारं IRCTC App अपडेट करण्याचं काम सुरू आहे. हे अपडेट झाल्यानंतर प्रवाशांना तिकीट बुक करणं अधिक सोपं होणार आहे. 

मुंबई : रेल्वेने प्रवासाला जाताना सर्वात आधी तिकीट बुक करावं लागतं. रेल्वेच्या IRCTC App वरुन हे तिकीट बुक करता येतं. आयआरसीटीसी ही वेबसाइट तिकीट बुक करण्यासाठी अतिशय फायद्याची ठरते. घरबसल्या हवं तेव्हा या वेबसाइटवरुन सोप्या ऑनलाइन पद्धतीने तिकीट बुक करता येतं. पण आता रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या वेबसाइटमध्ये काही बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनांनंतर IRCTC आणि CRIS च्या अधिकाऱ्यांनी आरआरसीटीसी वेबसाइटचं नवं बीटा व्हर्जन तयार केलं. MNIT जयपूरच्या विद्यार्थ्यांना नव्या अपडेटेड वेबसाइटचं 'बीटा' व्हर्जन दाखवण्यात आलं. नंतर नव्या वेबसाइटवर फिडबॅकही घेतला. त्यामुळे नव्या अपडेटेड वेबसाइटवरुन आताच्या तुलनेत तिकीट बुक करणं अधिक सोपं होण्यास मदत होऊ शकते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

IRCTC च्या वेबसाइटचं बीटा व्हर्जन का सुरू केलं?

आयआरसीटीसीच्या आताच्या वेबसाइटमध्ये अनेक त्रुटी असल्याचं समोर आलं. या त्रुटी MNIT जयपूरच्या विद्यार्थ्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमोर आणल्या. त्यानंतर रेल्वे मंत्र्यांनी या त्रुटी सोडवण्यासाठी आताची वेबसाइट नव्याने अपडेट करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसंच विद्यार्थ्यांकडून इतरही माहिती घेतली.

रेल्वेचं उद्दिष्ट १५ जुलैपर्यंत नव्या वेबसाइटचं बीटा व्हर्जन सुरू करण्याचं आहे. सध्या आताची वेबसाइट नव्या वेबसाइटला जोडण्याचं काम सुरू आहे. काही महिन्यात प्रवाशांना हे नवं IRCTC चं अपडेटेड व्हर्जन App तिकीट बुकिंगसाठी वापरता येईल.

नव्या वेबसाइटमध्ये काय - काय होणार?

अनावश्यक कॅप्चा कोड, पॉप-अप आणि फ्लॅशिंग ग्राफिक्ट काढून टाकले जातील. तिकीट बुकिंग करताना असलेली मोठी प्रोसेस आता कमी केली जाईल. तसंच सर्व क्लासची सीट उपलब्धता एकाच वेळी दिसेल. शिवाय सेव्ह पॅसेंजर डिटेल्सच्या सुविधेमुळे पुन्हा तिकीट बुक करताना अधिक सोपं होईल.

दरम्यान, रेल्वेकडून लाँच करण्यात आलेलं रेलवन अॅप आतापर्यंतचं सर्वात मोठं रेल्वे बुकिंग अॅप बनलं आहे. RailOne App ने ४ कोटी डाऊनलोडचा आकडा पार केला आहे. या अॅपमुळे रेल्वेच्या सर्वच सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होत असल्याने रेल्वे, ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होतो.