रिलायन्स जिओने दिवाळीनिमित्त १०,००० रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन आणला आहे. यात ३ वर्षांची (१,०९५ दिवस) व्हॅलिडिटी मिळते. रोज २.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि ५जी डेटासह अनेक फायदे यात आहेत. वार्षिक प्लॅनपेक्षा हा प्लॅन कसा परवडतो ते जाणून घ्या.
मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट रिचार्ज प्लॅन आणला आहे. तुम्हाला जर वारंवार मोबाईल रिचार्ज करण्याच्या कटकटीतून सुटका हवी असेल, तर जिओने थेट तीन वर्षांची व्हॅलिडिटी असलेला नवा प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. ₹१०,००० च्या या प्लॅनमध्ये एकदाच पैसे भरले की, पुढचे ३६ महिने टेन्शन फ्री मोबाईल सेवा वापरता येईल.
७ नोव्हेंबरपासून देशभरात उपलब्ध झालेल्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, रोजचा हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड 5G डेटा असे अनेक फायदे मिळतात. यासोबतच काही डिजिटल सेवांचं सबस्क्रिप्शनही दिलं जात आहे. 'द टाईम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, एकाच वेळी पैसे भरून सध्याचे रिचार्जचे फायदे सलग तीन वर्षांसाठी मिळवण्याची सोय या प्लॅनमध्ये आहे. ज्यांना दीर्घ मुदतीचा प्लॅन हवा आहे, त्यांच्यासाठी हा खास डिझाईन केला आहे.
जिओच्या १०,००० च्या प्लॅनमध्ये काय काय मिळतं?
जिओच्या या नव्या तीन वर्षांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना बरेच फायदे दिले जात आहेत.
व्हॅलिडिटी: ३६ महिने किंवा १,०९५ दिवस.
डेटा: रोज २.५ जीबी (2.5GB) हाय-स्पीड डेटा.
व्हॉईस कॉलिंग: सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग.
SMS: रोज १०० मेसेजेस.
5G डेटा: अनलिमिटेड 5G डेटा. (यासाठी तुमच्याकडे 5G मोबाईल आणि नेटवर्क कव्हरेज असणं आवश्यक आहे.)
मोबाईल सेवेव्यतिरिक्त डिजिटल एंटरटेनमेंट आणि इतर सुविधाही या प्लॅनमध्ये आहेत.
JioHotstar सबस्क्रिप्शन
या प्लॅनमध्ये JioHotstar Mobile + Hollywood चं सबस्क्रिप्शन मिळतं. यातून तुम्ही लाईव्ह स्पोर्ट्स, मनोरंजनाचे कार्यक्रम, हॉटस्टार ओरिजिनल्स आणि हॉलिवूडचे चित्रपट पाहू शकता.
१२ महिन्यांसाठी Canva Pro Lite
ग्राहकांना १२ महिन्यांसाठी Canva Pro Lite चं सबस्क्रिप्शनही दिलं जात आहे. यात डिझाईन टेम्पलेट्स आणि वेगवेगळे क्रिएटिव्ह टूल्स वापरता येतील. पण लक्षात ठेवा, हे सबस्क्रिप्शन फक्त १२ महिन्यांसाठीच असेल. म्हणजे संपूर्ण तीन वर्षांच्या व्हॅलिडिटीसाठी ही सुविधा नसेल.
50GB JioAICloud स्टोरेज
याशिवाय ५० जीबी (50GB) मोफत JioAICloud स्टोरेजची सुविधाही आहे. इथे ग्राहक त्यांचे फोटो, डॉक्युमेंट्स आणि महत्त्वाच्या फाईल्स क्लाऊडवर सेव्ह करून ठेवू शकतात.
रोजचा खर्च फक्त ९.१३
जिओच्या या नव्या १०,००० च्या प्लॅनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याचा रोजचा खर्च. एकूण १,०९५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी १०,००० रुपये मोजावे लागत असल्याने, दिवसाला सरासरी फक्त ९.१३ खर्च येतो. महिन्याचा विचार केला तर तो सरासरी २७८ रुपये पडतो. दर महिन्याला किंवा काही महिन्यांनी रिचार्ज करण्यापेक्षा, एकदाच पैसे भरून दीर्घकालीन सेवेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा प्लॅन खूप फायद्याचा ठरू शकतो.
जिओच्या वार्षिक प्लॅनपेक्षा ७९७ ची बचत
जिओच्या सध्याच्या ₹३,५९९ च्या वार्षिक रिचार्ज प्लॅनमध्ये ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. त्यातही रोज २.५ जीबी डेटा, अनलिमिटेड 5G आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळतं. जर तुम्ही तीन वर्षांसाठी हाच ३,५९९ चा प्लॅन तीन वेळा मारला, तर एकूण १०,७९७ खर्च येतील. पण या नव्या १०,००० च्या प्लॅनमध्ये एकाच वेळी तीन वर्षांची व्हॅलिडिटी मिळत असल्यामुळे, वार्षिक प्लॅन तीन वेळा घेण्याच्या तुलनेत तुमची थेट ७९७ ची बचत होते.













