सार
वनप्लस ओपन २ हा फोल्डेबल फोन २०२५ मध्ये लॉन्च होणार नाही, अशी पुष्टी वनप्लसने केली आहे.
शेन्झेन: चायनीज स्मार्टफोन ब्रँड वनप्लसचा पुढील पिढीतील फोल्डेबल फोन वनप्लस ओपन २ यावर्षी लॉन्च होणार नाही. वनप्लस ओपन २ २०२५ मध्ये येणार नाही, अशी पुष्टी कंपनीने केली आहे.
वनप्लस ओपन २ हा फोल्डेबल स्मार्टफोन येण्याची उत्सुकता आणि चर्चा वाढत असतानाच हा फोन येण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. यावर्षी वनप्लस ओपन २ फोल्डेबल लॉन्च होणार नाही, असे वनप्लसने एका कम्युनिटी पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. २०२३ मध्ये वनप्लसने त्यांचा पहिला फोल्डेबल फोन वनप्लस ओपन लॉन्च केला होता. त्याच्या यशानंतर २०२४ मध्ये त्याचा अपेक्स व्हेरियंट लॉन्च करण्यात आला. सर्वात नाविन्यपूर्ण आणि नवीन बेंचमार्क निर्माण करणारे उत्पादने बाजारात आणणे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळेच वनप्लस ओपन २ चे लॉन्चिंग २०२५ मध्ये न करण्याचा निर्णय घेतल्याचे वनप्लसने ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे.
वनप्लसची उपकंपनी ओप्पो नवीन फोल्डेबल फोन लॉन्च करणार असल्याची पुष्टी झाल्याने वनप्लसने हा निर्णय घेतला आहे. ओप्पोचा फाइंड एन५ हा फोन २० फेब्रुवारी रोजी जागतिक बाजारपेठेत लॉन्च होईल. मात्र, ओप्पो फाइंड एन५ लगेच भारतात येणार नाही. या फोनसाठी भारतीयांना वाट पाहावी लागेल. ओप्पो एन५ लॉन्च होत असल्याने, फोल्डेबल फोनच्या समीकरणांना आव्हान देणारा आणि ग्राहकांना नवीन अनुभव देणारा फोन आणण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे, असे वनप्लसने म्हटले आहे.
स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिपसेट असलेला हा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असेल, असे ओप्पो फाइंड एन५ बद्दल म्हटले जात आहे. यात ओप्पो ७-कोर व्हेरियंटचा वापर करत आहे. ५,६०० एमएएच क्षमतेची बॅटरी असलेला ओप्पो फाइंड एन५ आकर्षक डिझाइनमध्ये बाजारात येईल.