२०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत मुंबईच्या लक्झरी घरांच्या बाजारात १८,५१२ कोटी रुपयांची विक्रमी विक्री झाली आहे. ही गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्के वाढ आहे. इंडिया सोथबीज आणि CRE मॅट्रिक्सच्या रिपोर्टनुसार, या काळात एकूण ९५७ व्यवहार झाले, जे गेल्या वर्षीपेक्षा २६ टक्के जास्त आहेत.

मुंबई : मुंबईच्या लक्झरी घरांच्या बाजाराने एक नवा रेकॉर्ड केला आहे. इंडिया सोथबीज इंटरनॅशनल रियल्टी आणि CRE मॅट्रिक्स यांच्या संयुक्त अहवालानुसार, कॅलेंडर वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीत तब्बल १८,५१२ कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाली आहे. हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा सहामाही आकडा आहे.

१० कोटी किंवा त्याहून अधिक किमतीच्या घरांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी २०२५ च्या पहिल्या सहामाहीत हा आकडा १६,५१८ कोटी रुपये होता. या अहवालानुसार, या सहा महिन्यांच्या काळात ९५७ लक्झरी घरांचे व्यवहार झाले, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा २६ टक्क्यांनी जास्त आहेत.

गेल्या १२ महिन्यांतील विक्रमी कामगिरी

गेल्या १२ महिन्यांचा विचार केल्यास, प्रायमरी आणि सेकंडरी मार्केटमध्ये मिळून सुमारे १,६९९ लक्झरी युनिट्स विक्री झाली. कोणत्याही १२ महिन्यांच्या कालावधीतील हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. या घरांची एकूण किंमत जवळपास ३४,००० कोटी रुपये आहे.

बाजारपेठेच्या मजबुतीवर तज्ज्ञांचे मत

इंडिया सोथबीज इंटरनॅशनल रियल्टीचे कार्यकारी संचालक सुदर्शन शर्मा म्हणाले, "२०२६ च्या पहिल्या सहामाहीतील आकडेवारीवरून हे स्पष्ट होतं की मुंबईची लक्झरी घरांची बाजारपेठ भारतातील सर्वात मजबूत बाजारपेठांपैकी एक आहे. १० कोटींहून अधिक किमतीच्या घरांची विक्री जवळपास दुप्पट झाली असून, १८,५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. हा एक सहामाही विक्रम आहे."

ते पुढे म्हणाले, "घरांच्या किमतींमध्ये योग्य प्रमाणात वाढ झाली आहे, कारण विकासकांनी अवाजवी किमती टाळल्या आहेत. सेकंडरी मार्केटमधील विक्रीही प्रायमरी मार्केटसोबतच वाढली आहे. हा वेग कायम राहिल्यास, भारताच्या आर्थिक राजधानीतील लक्झरी घरांची बाजारपेठ सावधपणे आणि अंतिम वापरकर्त्यांच्या खरेदीमुळे वाढत राहील."

वेगवेगळ्या सेगमेंटमधील विक्री आणि प्रमुख कारणं

या वाढीमध्ये २० ते ४० कोटी रुपये किमतीच्या घरांचा मोठा वाटा आहे. २०२३ च्या पहिल्या सहामाहीत या सेगमेंटमध्ये ६६ युनिट्स विकली गेली होती, तर २०२६ च्या पहिल्या सहामाहीत हा आकडा १५६ युनिट्सवर पोहोचला.

प्रायमरी मार्केटमध्ये विकल्या गेलेल्या घरांपैकी ५८ टक्के घरं २,००० ते ४,००० चौरस फूट आकाराची होती.

भौगोलिकदृष्ट्या पाहिल्यास, टॉप १० परिसरांमध्ये एकूण प्रायमरी लक्झरी विक्रीच्या जवळपास ८० टक्के विक्री झाली. यात वरळीने बाजी मारली असून, तिथे ४,४९३ कोटी रुपयांची विक्री झाली.

रिसेल मार्केट आणि किमतींमधील बदल

पहिल्या सहामाहीत लक्झरी रिसेल घरांचे व्यवहार ४,८४० कोटी रुपयांवर पोहोचले. तर, लक्झरी घरांच्या सरासरी किमतीत ४ टक्क्यांची घट होऊन ती सुमारे ७२,२७० रुपये प्रति चौरस फूट झाली.

विक्रीचा वेग कायम

CRE मॅट्रिक्सचे सह-संस्थापक आणि सीईओ अभिषेक किरण गुप्ता म्हणाले, "मुंबईच्या लक्झरी रिअल इस्टेट मार्केटने २०२६ च्या पहिल्या सहामाहीत १८,५१२ कोटी रुपयांची विक्री नोंदवून एक नवीन बेंचमार्क गाठला आहे. २०२५ च्या दुसऱ्या सहामाहीसोबत मिळून गेल्या १२ महिन्यांतील एकूण व्यवहार मूल्य सुमारे ३४,००० कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे आतापर्यंतचे सर्वाधिक आहे."

ते पुढे म्हणाले, "या काळात सुमारे १,७०० लक्झरी युनिट्स विकली गेली, जी १२ महिन्यांतील सर्वोत्तम कामगिरी आहे. विशेषतः २०-४० कोटी रुपयांच्या सेगमेंटमध्ये टिकून असलेला हा वेग दर्शवतो की उच्चभ्रू खरेदीदार बाजारात सक्रिय आणि आत्मविश्वासी आहे, पण तो आपला पैसा कुठे गुंतवायचा याचा अधिक विचारपूर्वक निर्णय घेत आहे."

घर खरेदी करणारे कोण आहेत?

खरेदीदारांच्या माहितीनुसार, २०२६ च्या पहिल्या सहामाहीत ३५ ते ५५ वयोगटातील खरेदीदारांनी ५८ टक्के लक्झरी घरं खरेदी केली, तर ६५ वर्षांवरील खरेदीदारांचे प्रमाण १२ टक्के होते.