मारुती सुझुकीची लोकप्रिय व्हॅन 'इको'ने भारतात १५ लाख युनिट्स विक्रीचा मोठा टप्पा ओलांडला आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी कंपनीने १८ नवीन ॲक्सेसरीजसह 'स्टार एडिशन'ही लाँच केलं आहे. कुटुंबांसाठी आणि छोट्या व्यवसायांसाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त ठरली.
मुंबई : मारुती सुझुकीची लोकप्रिय व्हॅन 'इको'ने (Maruti Suzuki Eeco) भारतीय बाजारात एक नवीन रेकॉर्ड केला आहे. कंपनीने जाहीर केलंय की, या मॉडेलची एकूण विक्री १५ लाख युनिट्सच्या पुढे गेली आहे. जानेवारी २०१० मध्ये लाँच झालेली इको गेल्या १६ वर्षांपासून ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. ही गाडी फक्त वैयक्तिक वापरासाठीच नाही, तर छोटे व्यावसायिक, दुकानदार, उद्योजक आणि विविध व्यावसायिक क्षेत्रातील लोकही या व्हॅनचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. मोठी केबिन, वापरातील सोपेपणा आणि गरजेनुसार अनेक व्हेरिएंट्स उपलब्ध असल्यामुळे इको इतकी लोकप्रिय झाली आहे. सध्या मारुती सुझुकी इकोची एक्स-शोरूम किंमत ₹5.21 लाख ते ₹6.46 लाख दरम्यान आहे.
विक्रीचा वेग वाढला
इकोच्या विक्रीचा वेग गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढला आहे. पहिल्या ५ लाख गाड्या विकायला जवळपास आठ वर्षं लागली. त्यानंतरच्या ५ लाख गाड्या पाच वर्षांत विकल्या गेल्या. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पुढच्या ५ लाख गाड्यांची विक्री फक्त साडेतीन वर्षांत पूर्ण झाली. यावरून भारतीय बाजारात इकोची मागणी किती मजबूत आहे, हे स्पष्ट होतं.
१५ लाखांचा जल्लोष, 'स्टार एडिशन' लाँच
१५ लाख युनिट्स विक्रीचा टप्पा साजरा करण्यासाठी मारुती सुझुकीने 'इको स्टार एडिशन' (Eeco Star Edition) सादर केलं आहे. या गाडीला अधिक स्टायलिश आणि प्रीमियम लुक देण्यासाठी यात १८ नवीन एक्सटीरियर आणि इंटीरियर ॲक्सेसरीज देण्यात आल्या आहेत. यात बॉडी-कलर बंपरसारखे कॉस्मेटिक बदल आहेत. मात्र, गाडीच्या इंजिन किंवा इतर तांत्रिक बाबींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कंपनीने मुख्यत्वे एक्सटीरियर डिझाइन आणि केबिनमधील अनुभव सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे.
एकूण १३ व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध
सध्या मारुती सुझुकी इको एकूण १३ वेगवेगळ्या व्हेरिएंट्समध्ये विकली जाते. यात ५-सीटर, ६-सीटर पॅसेंजर व्हर्जनसोबतच टूर व्ही (Tour V), ॲम्ब्युलन्स (Ambulance) आणि कार्गो (Cargo) व्हेरिएंट्सचाही समावेश आहे. ग्राहक आपल्या गरजेनुसार पेट्रोल आणि एस-सीएनजी (S-CNG) पर्याय निवडू शकतात. कौटुंबिक सहलींपासून ते पर्यटन, मालवाहतूक, छोटे व्यवसाय आणि अत्यावश्यक सेवांपर्यंत विविध कामांसाठी इको वापरली जाण्याचं हे एक प्रमुख कारण आहे.
ग्रामीण भागातही इकोचाच बोलबाला
मारुती सुझुकीच्या आकडेवारीनुसार, इकोच्या विक्रीत ग्रामीण भागाचा मोठा वाटा आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात इकोच्या एकूण विक्रीपैकी सुमारे ६५% विक्री ग्रामीण बाजारातून झाली. याच काळात, इको खरेदी करणाऱ्यांपैकी सुमारे ५५% ग्राहक हे पहिल्यांदाच कार खरेदी करणारे होते. तर ५१% पेक्षा जास्त ग्राहक व्यावसायिक होते. यावरून ग्रामीण ग्राहक, पहिले वाहन खरेदीदार आणि छोटे व्यावसायिक यांच्यात इको किती लोकप्रिय आहे, हे दिसून येतं.
कुटुंबासाठी आणि व्यवसायासाठी एक उत्तम पर्याय
गेल्या १६ वर्षांच्या प्रवासात मारुती इकोने भारतीय बाजारात आपलं स्थान पक्कं केलं आहे. वेगवेगळे व्हेरिएंट्स, पेट्रोल आणि सीएनजीचे पर्याय आणि बहुपयोगी स्वरूप ही या मॉडेलची प्रमुख ताकद आहे. कौटुंबिक वापरापासून ते व्यावसायिक गरजांपर्यंत, शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये इकोला मोठी मागणी आहे. १५ लाख युनिट्स विक्रीचा टप्पा हेच या लोकप्रिय व्हॅनच्या यशाचं प्रतीक आहे.

