इंडोनेशियाचे हे पाऊल देशाच्या जुन्या लष्करी उपकरणांच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने पहिले पाऊल मानले जात आहे.

जकार्ता: जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम देशाने फ्रान्सकडून पहिली राफेल लढाऊ विमाने मिळवली आहेत. फ्रान्ससोबतच्या अब्जावधी डॉलर्सच्या संरक्षण कराराचा भाग म्हणून इंडोनेशियाने तीन राफेल लढाऊ विमाने खरेदी केली आहेत. इंडोनेशियाचे हे पाऊल देशाच्या जुन्या लष्करी उपकरणांच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने पहिले पाऊल मानले जात आहे. सध्याच्या परिस्थितीत आशिया-पॅसिफिक क्षेत्रात तणाव वाढत आहे. इंडोनेशियाने फ्रेंच कंपन्यांसोबत अनेक लष्करी करार केले आहेत. त्यापैकी 42 राफेल लढाऊ विमाने खरेदी करणे महत्त्वाचे आहे. इंडोनेशियाने 2021 मध्ये फ्रान्ससोबत 8.1 अब्ज डॉलर्सचा करार केला होता. त्यानुसार, पहिल्या तीन राफेल विमानांची डिलिव्हरी शुक्रवारी करण्यात आली. ही तीन राफेल विमाने सुमात्रा येथील रोस्मिन नुरजादीन हवाई तळावर दाखल झाली आहेत. 

विमाने सुमात्राच्या रोस्मिन नुरजादीन हवाई तळावर दाखल

इंडोनेशिया हा आग्नेय आशियातील फ्रान्सचा सर्वात मोठा शस्त्र खरेदीदार देश आहे. माजी विशेष दल कमांडर आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण खर्च वाढवण्याच्या योजनेचा भाग म्हणून इंडोनेशिया फ्रेंच युद्धनौका आणि पाणबुड्या खरेदी करण्याचीही योजना आखत आहे. या वर्षाच्या अखेरीस आणखी विमाने येण्याची अपेक्षा आहे, परंतु संरक्षण मंत्रालयाने त्यांची संख्या स्पष्ट केलेली नाही. हवाई दलाच्या आधुनिकीकरणाचा भाग म्हणून इंडोनेशिया चीनची J-10 आणि अमेरिकेची F-15EX विमाने खरेदी करण्याचाही विचार करत आहे. याशिवाय, देशाने तुर्कीकडून 48 KAAN लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या करारावरही स्वाक्षरी केली आहे.