ट्रेनमध्ये प्रवास करताना मोबाईलवर रील्स, सिनेमे किंवा व्हिडीओ पाहणं खूप कॉमन आहे. पण आता रेल्वेने नियमांमध्ये काही बदल केले आहेत. तुम्ही जर रील्स पाहताना हा नियम मोडला, तर तुम्हाला नक्कीच दंड भरावा लागेल.
नवी दिल्ली : भारतीय वाहतूक व्यवस्थेत रेल्वेला खूप महत्त्व आहे. बहुतांश लोक ट्रेननेच प्रवास करणं पसंत करतात. त्यामुळे रोजच ट्रेन्समध्ये मोठी गर्दी असते. ट्रेनने प्रवास करताना प्रवाशांना काही नियम पाळावे लागतात. आता यापैकी काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. जुन्या सवयीनुसार प्रवास केला तर आता तुम्हाला दंड बसू शकतो. नव्या नियमानुसार, ट्रेनमध्ये रील्स पाहण्यावर कोणतीही बंदी नाही. पण, रील्स पाहताना तुम्ही जर हा नियम मोडला, तर मात्र दंड नक्की बसेल.
काय आहे रेल्वेचा नवा नियम?
ट्रेन प्रवासात प्रवाशांची सुरक्षा आणि आरामदायी प्रवासाला प्राधान्य दिलं जातं. गर्दीने भरलेल्या ट्रेनमध्ये सगळेच जण मोबाईल वापरतात. पण नव्या नियमानुसार, आता ट्रेनमध्ये मोबाईलवर रील्स पाहताना इअरफोन्स लावणं सक्तीचं करण्यात आलं आहे. तुमच्या मोबाईलच्या स्पीकरच्या आवाजामुळे शेजारी बसलेल्या प्रवाशांना त्रास होता कामा नये. यासोबतच काही कडक नियमांचंही पालन करावं लागेल.
गर्दी असलेल्या ट्रेनमध्ये तुम्ही फोनवर बोलताना लाऊडस्पीकर ऑन करू शकत नाही. फोनवर गाणी ऐकण्यासाठी इअरफोन किंवा इअरबड्सचाच वापर करावा लागेल. फोनचा लाऊडस्पीकर किंवा स्पीकरवर गाणी, रील्स, सिनेमे असं काहीही लावता येणार नाही. इतर प्रवाशांना होणारा त्रास टाळण्यासाठी हा नियम कडकपणे लागू करण्यात आला आहे.
मोठा दंड किंवा थेट तुरुंगवास
ट्रेन प्रवासादरम्यान फोन आणि स्पीकरच्या नियमांचं उल्लंघन केल्यास मोठा दंड आकारला जाईल. हा दंड १००० रुपयांपासून ते ५००० रुपयांपर्यंत असू शकतो. जर तुम्ही वारंवार हा नियम मोडला, तर जास्तीत जास्त ५००० रुपये दंड आणि तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. त्यामुळे प्रवाशांनी ट्रेनमध्ये रील्स पाहताना किंवा मोबाईल वापरताना इअरफोन्सचा वापर करावा, जेणेकरून दंडापासून बचाव होईल.
दक्षिण रेल्वेचा इशारा
दक्षिण रेल्वेने आता या सुधारित नियमाबाबत एक महत्त्वाचा आदेश काढला आहे. सर्व सहा डिव्हिजन झोनला हा आदेश देण्यात आला आहे. जन विश्वास कायदा २०२६ अंतर्गत तिकीट कलेक्टर (TC) याची तपासणी करून दंड वसूल करतील.
रेल्वे स्टेशन आणि इंडियन रेल्वेच्या ॲपवरही हा मेसेज दिला जात आहे. सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करताना किमान नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. रेल्वे विभागाने यापूर्वीही अनेकदा प्रवाशांना याबाबत आवाहन केलं होतं. पण आता कडक नियमांद्वारे प्रवाशांना थेट इशाराच देण्यात आला आहे.








