सार

सध्याच्या काळात प्रत्येकजण बहुतांश आर्थिक व्यवहार डिजीटल करतो. त्यामुळे स्मार्टफोनमध्ये Paytm,Googlepay आणि Phonepe सारखे अॅप अगदी सामान्य झालेत.पण स्मार्टफोन चोरीला गेल्यास? माणूस भांबावून जातो. काय करायचं समजत नाही. यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.

तंत्रज्ञाच्या प्रगतीमुळे माणसांची कामे सहज आणि सोपी झाली आहेत. आता स्मार्ट फोनचच घ्या, असा एकही व्यक्ती नाही ज्याच्याकडे स्मार्टफोन नाही. पण त्याचे तोटेही आहेतच . सध्याच्या काळात प्रत्येकजण बहुतांश आर्थिक व्यवहार डिजीटल करतो. त्यामुळे स्मार्टफोनमध्ये Paytm, Google pay आणि Phone pe सारखे अॅप अगदी सामान्य झालेत. पण हा स्मार्टफोन चोरीला गेल्यास? माणूस भांबावून जातो. काय करायचं समजत नाही. यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा तुमच्या खात्यातून पैसे गायब होऊ शकतात. तसेच तुमच्या मोबाईलचा दुरुपयोग देखील होऊ शकतो. त्यामुळे सर्वात आधी मोबाईल चोरीला गेल्यास अकाऊंट ब्लॉक करणं गरजेचं आहे. ते कसं करायचं हे काही सोप्या शब्दात समजून घ्या.

Google Pay account कसं ब्‍लॉक करणार?

  1.  फोन चोरीला गेल्यास सर्वात आधी Google Pay चा हेल्‍पलाईन नंबर 18004190157 वर कॉल करा.
  2. या नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्ही तज्ज्ञांसोबत बोलण्याचा पर्याय निवडू शकता. त्यांच्याकडून तुम्हाला अकाउंट बंद करण्याची माहिती मिळेल.
  3. अँड्रॉईड फोन वापरणारे आपल्या फोनमधून डेटा ‘रिमोट वाइप’ करु शकतात. जेणेकरुन कुणीही तुमच्या गुगल खात्यापर्यंत पोहचणार नाही.
  4. याच प्रकारे iPhone वापरणारे देखील आपला डेटा मिटवू शकतात.

Paytm खातं कसं बंद करणार?

  1.  सर्वात आधी पेटीएम पेमेंट्स बँक हेल्पलाइन नंबर 01204456456 वर कॉल करा.
  2.  इथं ‘Lost Phone’ हा पर्याय निवडा.
  3. पर्यायी नंबर नोंदवण्याचा पर्याय निवडला की चोरीला गेलेला फोन नंबर टाका.
  4. यानंतर पेटीएमच्या वेबसाईटवर जा आणि ’24×7 हेल्प’ हा पर्याय निवडा. नंतर ‘फसवणुकीची तक्रार’ हा पर्याय निवडा.
  5. ‘मेसेज अस’ या पर्यायावर क्लिक करून पुढील माहिती द्या. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डची किंवा पोलीस तक्रारीची किंवा आधारसारख्या ओळखपत्राची मागणीही होऊ शकते.
  6. पडताळणीनंतर पेटीएम तुमची विनंती पुढे पाठवेल आणि खातं ब्लॉक करण्यात येईल.

Phone pe पेमेंट अकाउंट कसं ब्लॉक करणार?

  1.  Phone Pe यूजर्स हेल्पलाइन नंबर 08068727374 वर कॉल करु शकता.
  2.  नंतर Phone Pe खात्याविषयी तक्रार नोंदवण्याचे पर्याय येतील. त्यातील योग्य पर्याय निवडा.
  3. आता तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक द्यावा लागेल आणि पडताळणीसाठी एक ओटीपी पाठवला जाईल.
  4. ओटीपी प्राप्त न झाल्याचा पर्याय निवडा. इथं तुम्हाला सीमकार्ड किंवा मोबाईल फोन हरवल्याचा पर्याय दिसेल. तो निवडा.
  5. यानंतर खातं ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू होईल.