Indian Market as Best Selling Bike : भारतात टू-व्हीलरची मागणी प्रचंड वाढली आहे. अनेक कंपन्यांमध्ये स्पर्धा असतानाही, एका बाईकने मात्र सगळ्यांना मागे टाकलंय. जाणून घ्या कोणती आहे ही देशातील नंबर वन बाईक आणि तिची किंमत किती आहे.
नवी दिल्ली : भारताच्या रस्त्यांवर सध्या कार आणि बाईक्सची मोठी गर्दी दिसतेय आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. यावर्षी जुलै महिन्यात तर देशात बाईकच्या विक्रीने एक नवीन रेकॉर्ड केला आहे. देशांतर्गत बाईकची विक्री १.९२३ दशलक्ष युनिट्सच्या पुढे गेली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये विकल्या गेलेल्या १.५६९ दशलक्ष युनिट्सच्या तुलनेत ही तब्बल २२.६ टक्क्यांची वाढ आहे.
जुलै २०२६ मध्ये एकूण २.४७७ दशलक्ष युनिट्सपेक्षा जास्त विक्री झाली, जी वर्षानुवर्षे २३.७ टक्क्यांची वाढ दर्शवते. देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पची एन्ट्री-लेव्हल बाईक, स्प्लेंडरने, जुलै २०२६ मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप १० दुचाकींच्या यादीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलं आहे.
सर्वाधिक विकली जाणारी हिरो स्प्लेंडर
भारतात हिरो स्प्लेंडर पहिल्या क्रमांकावर आहे. ही देशातली सर्वाधिक विकली जाणारी बाईक ठरली आहे. विशेष म्हणजे, या बाईकची किंमत फक्त ७७,७७७ रुपयांपासून सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी लवकरच नवीन अपग्रेडसह ही बाईक बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.
हिरो स्प्लेंडरच्या विक्रीत ३५.९ टक्के वाढ
जुलै २०२६ मध्ये हिरो स्प्लेंडरने जबरदस्त कामगिरी केली. जुलै २०२५ मध्ये २,४६,७१५ युनिट्सची विक्री झाली होती, तर जुलै २०२६ मध्ये हा आकडा ३,३५,३४६ युनिट्सवर पोहोचला. म्हणजेच, वर्षभरात विक्रीत तब्बल ३५.९ टक्क्यांची वाढ झाली आहे. हिरो स्प्लेंडरमध्ये ९७.२ सीसी क्षमतेचं इंजिन आहे.
होंडा ॲक्टिव्हा दुसऱ्या स्थानावर
होंडा ॲक्टिव्हा २,०६,१७० युनिट्सच्या विक्रीसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली. मात्र, तिच्या विक्रीत वर्षभरात १३.१ टक्क्यांची घट झाली आहे. जुलै २०२५ मध्ये ॲक्टिव्हाचे २,३७,४१३ युनिट्स विकले गेले होते. विक्रीत घट होऊनही, ॲक्टिव्हाने टॉप १० मध्ये आपलं दुसरं स्थान कायम राखलं आहे.
होंडा शाईनच्या विक्रीत वाढ
होंडा शाईननेही तिसरं स्थान कायम राखलं आहे. जुलै २०२६ मध्ये या बाईकचे १,९१,९५० युनिट्स विकले गेले, तर जुलै २०२५ मध्ये हा आकडा १,५९,६५८ युनिट्स होता. म्हणजेच, शाईनच्या विक्रीत वर्षभरात २०.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. यानंतर, टीव्हीएस ज्युपिटर चौथ्या क्रमांकावर, तर सुझुकी ॲक्सेस पाचव्या क्रमांकावर आहे. बजाज पल्सर ६६,१५६ युनिट्सच्या विक्रीसह सहाव्या स्थानावर आहे, तर टीव्हीएस अपाचे सातव्या स्थानावर आहे.


