पगारदार व्यक्तींनी अचानक येणाऱ्या आर्थिक संकटांपासून वाचण्यासाठी इमर्जन्सी फंड, हेल्थ इन्शुरन्स आणि एसआयपी (SIP) गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. सहा महिन्यांच्या पगाराएवढा इमर्जन्सी फंड, योग्य हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आणि उत्पन्नाचा काही भाग एसआयपीमध्ये गुंतवल्यास दीर्घकाळ आर्थिक सुरक्षा मिळू शकते.
मुंबई : चांगला पगार असूनही महिन्याच्या शेवटी पैशांची अडचण येते का? अचानक नोकरी गेली किंवा एखादा मोठा खर्च समोर आला तर काय करायचं, अशी चिंता वाटते का? काळजी करू नका. काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही तुमची आर्थिक बाजू मजबूत करू शकता. यासाठी काय करायला हवं, ते पाहूया.
इमर्जन्सी फंड (Emergency Fund)
नफा कमावण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे, गरजेच्या वेळी तुमच्याकडे पैसे उपलब्ध असणं. यासाठी तुमच्या ६ महिन्यांच्या पगाराएवढी रक्कम इमर्जन्सी फंड म्हणून बाजूला काढून ठेवली पाहिजे. ही रक्कम तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट (FD) किंवा लिक्विड फंडमध्ये ठेवू शकता. उदाहरणार्थ, जर तुमचा पगार दरमहा ५०,००० रुपये असेल, तर तुम्ही गुंतवणुकीव्यतिरिक्त ३ लाख रुपये इमर्जन्सी फंड म्हणून तयार ठेवावेत. लक्षात ठेवा, इमर्जन्सी फंड ही गुंतवणूक नाही, तर गरजेच्या वेळी सहज काढता येणारा राखीव पैसा आहे.
हेल्थ इन्शुरन्स (Health Insurance)
आजच्या काळात, मोठ्या आजारपणात होणाऱ्या खर्चापासून तुमच्या बचतीला वाचवण्यासाठी हेल्थ इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे. एका छोट्या कुटुंबासाठी १० लाख ते २५ लाख रुपयांपर्यंतचं कव्हर घेणं योग्य ठरतं. फक्त कंपनीच्या इन्शुरन्सवर अवलंबून राहू नका. कारण नोकरी बदलल्यावर किंवा निवृत्त झाल्यावर कंपनीचा ग्रुप इन्शुरन्स संपतो. पॉलिसी निवडताना ९०% पेक्षा जास्त क्लेम सेटलमेंट रेशो, रूम रेंटवर मर्यादा नसलेली पॉलिसी आणि रिस्टोरेशन बेनिफिट यांसारख्या गोष्टी नक्की तपासा.
दीर्घकालीन संपत्तीसाठी एसआयपी (SIP)
वरच्या दोन गोष्टींची सोय झाली की मग गुंतवणुकीला सर्वाधिक महत्त्व द्या. तुमच्या पगाराच्या १०% ते २०% रक्कम म्युच्युअल फंड एसआयपी (SIP) द्वारे नियमितपणे गुंतवायला सुरुवात करा. ५०,००० रुपये पगार असणारी व्यक्ती दरमहा ५,००० ते १०,००० रुपयांची गुंतवणूक सुरू करू शकते. बाजारातील चढ-उतारांची चिंता न करता दीर्घकाळासाठी केलेली नियमित गुंतवणूक तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा (Compounding) जबरदस्त फायदा मिळवून देते. जसजसं तुमचं उत्पन्न वाढेल, तसतशी गुंतवणुकीची रक्कमही वाढवा.
उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचा पगार ५०,००० रुपये आहे आणि आवश्यक खर्च ३०,००० रुपये आहे. अशा व्यक्तीने सुरुवातीला ३ ते ६ महिन्यांच्या खर्चासाठी ९०,००० ते १.८ लाख रुपयांचा इमर्जन्सी फंड जमा करावा. इन्शुरन्स आणि इमर्जन्सी फंड तयार झाल्यावर, दरमहा ५,००० रुपयांची एसआयपी सुरू करता येते. पगारात वाढ झाल्यावर योग्य नियोजन केल्यास भविष्यातील मोठ्या आर्थिक संकटांपासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता.


