आपल्या शरिरातील महत्त्वाचा अवयव लिव्हर म्हणजे यकृत आहे. लिव्हरचे कार्य बिघडले की  सतत थकवा जाणवतो. लिव्हरचे कार्य बिघडल्याची आणखी कोणती लक्षणे आहेत. ते पाहूया. 

शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक म्हणजे लिव्हर (यकृत). शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचे काम लिव्हर करते. चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे लिव्हरच्या कार्यात अडथळा येऊ शकतो. लिव्हरचे कार्य बिघडल्यास शरीरात काही लक्षणे दिसू लागतात, ज्याबद्दल आपण जाणून घेऊया.

एक

सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक म्हणजे सततचा थकवा. कितीही विश्रांती घेतली तरी थकवा जात नसेल, तर हे महत्त्वाचे लक्षण आहे. लिव्हर ऊर्जा चयापचय आणि विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते, त्यामुळे त्याच्या कार्यात अडथळा आल्यास अस्वस्थता किंवा उर्जेची कमतरता जाणवते.

दोन

ज्या लोकांचे लिव्हर नीट काम करत नाही, त्यांना अन्न पचायला जड जाते. रक्तातील विषारी घटक वाढल्याने दीर्घकाळ मळमळ जाणवते आणि हळूहळू भूक मंदावते.

तीन

लिव्हर उजव्या बरगडीच्या खाली असते. या भागात दाब जाणवणे किंवा मंद वेदना होणे हे लिव्हरला सूज आल्याचे लक्षण असू शकते. अनेकजण याकडे ॲसिडिटी किंवा पचनाची समस्या समजून दुर्लक्ष करतात.

चार

निद्रानाश हे देखील लिव्हरच्या आजाराचे एक लक्षण आहे. शरीर मेलाटोनिन हार्मोन आणि ग्लुकोजवर ज्या प्रकारे प्रक्रिया करते, त्यात बदल झाल्यामुळे झोपेचे चक्र बिघडते आणि शांत झोप लागत नाही.

पाच

जेव्हा लिव्हर बिलीरुबिनवर योग्य प्रक्रिया करू शकत नाही किंवा पित्त तयार करू शकत नाही, तेव्हा लघवीचा रंग गडद पिवळा होतो. तसेच विष्ठेच्या रंगात बदल होणे हे देखील एक महत्त्वाचे लक्षण आहे.

सहा

सतत खाज सुटणे, विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी तीव्र खाज येणे, हे लिव्हर खराब झाल्याचे एक प्रमुख लक्षण आहे. शरीरात कुठेही खाज येऊ शकते, पण प्रामुख्याने तळहात आणि तळपायांवर जास्त खाज येते.

सात

जेव्हा लिव्हरचे कार्य अधिकच बिघडते, तेव्हा शरीरात बिलीरुबिन जमा होते. यामुळे त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू लागतो, ज्याला 'कावीळ' म्हणतात.

आठ

पाय, घोटे किंवा पोटावर सूज येणे हे लिव्हरच्या आजाराचे लक्षण असू शकते. यामुळे विशेषतः पायांच्या खालच्या भागात सूज (एडिमा) किंवा पोटात पाणी जमा (असायटिस) होऊ शकते.