New Gold : मार्केटमध्ये तांबे बनलं नवीन सोनं, नेमकी का आहे प्रचंड मागणी?
Copper Price: सोन्या-चांदीचे दर नवनवीन विक्रम करत आहेत. त्यामुळे अनेकजण त्यात गुंतवणूक करत आहेत. मात्र, या दोन्हींसोबतच आणखी एका धातूच्या किमतीही वाढणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सोन्यानंतर आता तांब्याची चलती -
मौल्यवान धातू म्हटलं की अनेकांना आधी सोनं आणि चांदी आठवतं. गुंतवणूकदारांचे लक्ष या दोन्हींवरच जास्त असते. पण आता परिस्थिती बदलत आहे. सध्या तांब्याच्या दरांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तांब्याची किंमत 12,000 डॉलर्सच्या पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे तांबे देखील मौल्यवान धातूंच्या यादीत महत्त्वाचे स्थान मिळवत आहे.
2025 मध्ये धातूंच्या किमतीत कशी वाढ झाली -
2025 मध्ये सोन्याची किंमत सुमारे 70 टक्क्यांनी वाढली. तर चांदीची किंमत आश्चर्यकारकपणे 140 टक्क्यांनी वाढली. याचवेळी तांब्याची किंमत 35 टक्क्यांनी वाढल्याने बाजारातील तज्ज्ञ विचारात पडले आहेत. 2009 नंतर तांब्याच्या दरात इतकी मोठी वाढ होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याच कारणामुळे काही तज्ज्ञ तांब्याला 'नवीन सोनं' आणि 'नवीन चांदी' म्हणत आहेत.
इलेक्ट्रिक वाहने आणि ग्रीन एनर्जीचा प्रभाव -
तांब्याची मागणी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्र. इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये तांब्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एका सामान्य कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कारमध्ये तिप्पट जास्त तांब्याची गरज असते. डेटा सेंटर्स, सौर ऊर्जा प्रकल्प आणि पवन ऊर्जा प्रकल्प देखील तांब्यावर अवलंबून आहेत. जग ग्रीन एनर्जीकडे वाटचाल करत असल्याने तांब्याचे महत्त्व आणखी वाढले आहे.
जागतिक राजकारण आणि अमेरिकेच्या शुल्काचा प्रभाव -
जगभरातील भू-राजकीय तणावाचा तांब्याच्या बाजारावर परिणाम होत आहे. काही देशांमध्ये खाणकाम मंदावल्याने पुरवठ्यावर दबाव वाढला आहे. त्यातच अमेरिकेने लादलेले शुल्कही महत्त्वाचे ठरले आहे. भविष्यात दर आणखी वाढतील या अपेक्षेने गुंतवणूकदारांनी तांब्याची साठवणूक सुरू केली आहे. त्यामुळे बाजारात उपलब्ध पुरवठा कमी झाला आहे.
उत्पादनात घट आणि गुंतवणूकदारांची आवड -
तांब्याच्या उत्पादनाचा खर्च वाढणे ही देखील एक समस्या बनली आहे. नवीन खाणी सुरू करण्यासाठी परवानग्यांना होणारा विलंब आणि कठोर झालेले पर्यावरणविषयक नियम उत्पादनावर मर्यादा घालत आहेत. त्याच वेळी, गुंतवणूकदार तांब्याकडे भविष्यातील धातू म्हणून पाहत गुंतवणूक करत आहेत. मागणी वेगाने वाढत असताना पुरवठा त्या प्रमाणात वाढत नसल्याने दर वाढत आहेत.

