Top 5 Sold Cars : जून महिन्यात कारची सर्वाधिक विक्री झाली. त्यामध्ये पाच कंपन्यांच्या कारला मोठी मागणी होती. कार घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. 

मुंबई : कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. भारतातील ऑटो मार्केटमध्ये मागील जून २०२६ या महिन्यात वाहनांची मोठी मागणी होती. प्रवासी वाहनांसह, व्यवसायासाठी लागणारी वाहनं, ट्रॅक्टर्स यांसारख्या वाहनांची मागील वर्षाच्या तुलनेत मोठी मागणी असल्याचं समोर आलं आहे. मागील जून २०२५ मध्ये वाहनांची विक्री संख्या ३.२१ लाख इतकी होती. मात्र यंदाच्या २०२६ च्या जून महिन्यात ही वाहनांची विक्री ४ लाखांवर गेली आहे. जून महिन्यात काही कार्सना मोठी मागणी होती आणि त्या कार्सची सर्वाधिक विक्री झाली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

मारुती सुझुकी

देशातील मारुती सुझुकी ही सर्वात मोठ्या कार उत्पादकांपैकी एक आहे. या कार कंपनीने जून २०२६ मध्ये १,४७,१८७ कार्सची विक्री केली आहे. मारुती सुझुकी कंपनीच्या वाहनांना असलेली मागणी हे या सर्वाधिक कार विक्री होण्यामागणं महत्त्वाचं कारण सांगितलं जात आहे. कंपनीच्या कारच्या विक्रीत ४५ टक्क्यांची वाढ झाली आहे. मारुती सुझुकीच्या सीएनजी कारची सर्वाधिक विक्री झाली. कंपनीच्या एकूण विक्रीत ४२ टक्के विक्री सीएनजी कार्सची झाली आहे. त्याशिवाय २००० ई-विटारा इलेक्ट्रिक एसयूव्हीची विक्री झाली आहे.

टाटा मोटर्स

मारुती सुझुकीनंतर जून महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या कार्समध्ये टाटा मोटर्सचं नाव आहे. 'टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स'ने जूनमध्ये ६२ हजार कारची विक्री केली आहे. मागील वर्षीच्या आकडेवारीनुसार यंदाची वाढ तब्बल ६७.३९ टक्क्यांनी वाढली आहे. सर्वाधिक विक्री इलेक्ट्रिक कारची झाली आहे. टाटा मोटर्सच्या एकूण कार्सपैकी या जून महिन्यात १४ हजार ८०० इलेक्ट्रिक वाहनं विकली गेली आहेत.

महिंद्रा अँड महिंद्रा

मारुती सुझुकी पहिल्या क्रमांकावर, टाटा मोटर्स दुसऱ्या तर जून महिन्यात सर्वाधिक विक्री केलेल्या कार्समध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कार्सचा तिसरा क्रमांक लागतो. महिंद्राच्या एसयूव्ही कारला सर्वाधिक मागणी होती. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कंपनीच्या विक्रीत २७ टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे.

हुंदाई मोटर इंडिया

वरील तीन वाहन कंपन्यांच्या कार मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी जून महिन्यात सर्वाधिक विकल्या गेल्या. मात्र हुंदाई कारची विक्री मागील कारच्या तुलनेत कमी झाली आहे. यावर्षी जून महिन्यात हुंदाईने ३९ हजार ६३५ वाहनांची विक्री केली आहे. या वर्षी हुंदाई कंपनीच्या कार्सची विक्री कमी होण्यामागे कंपनीकडून माहितीही देण्यात आली आहे. हुंदाईच्या एका कार सप्लायरच्या फॅक्ट्रीमध्ये आग लागल्याने जवळपास १४ हजार वाहनाचं नुकसान झालं होतं. त्यामुळे वाहनांची विक्रीही कमी झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

टोयोटा

जून २०२६ मध्ये टोयोटा कंपनीने २८ हजारहून अधिक वाहनांची विक्री केली. मागील वर्षी जून २०२५ च्या तुलनेत यंदाच्या वर्षी टोयोटा कारच्या विक्रीत वाढ झाली आहे. कंपनीच्या एसयूव्ही मॉडेलला मोठी मागणी आहे.