Apple Boosts Foldable iPhone Display Orders Expecting High Demand : ॲपल 2026 मध्ये आपला पहिला फोल्डेबल आयफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. 'आयफोन अल्ट्रा' असं याचं नाव असू शकतं. कंपनीला या फोनला मोठी मागणी मिळण्याची अपेक्षा असून, त्यासाठी सॅमसंग डिस्प्लेकडून मोठ्या प्रमाणात पॅनल ऑर्डर केले आहेत. यात 7.8-इंचाची मोठी स्क्रीन आणि A20 प्रो चिपसेट असेल.

Apple Boosts Foldable iPhone Display Orders Expecting High Demand : टेक जायंट ॲपल आपला पहिला फोल्डेबल आयफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने फोल्डेबल डिस्प्ले पॅनलची ऑर्डर मोठ्या प्रमाणात वाढवली आहे, असं नवीन रिपोर्ट्समधून समोर आलंय. यावरून ॲपलला आपल्या नव्या फोनच्या यशाबद्दल प्रचंड आत्मविश्वास असल्याचं दिसतंय. सध्या सॅमसंगसारख्या अँड्रॉइड ब्रँड्सचं वर्चस्व असलेल्या फोल्डेबल स्मार्टफोन मार्केटमध्ये ॲपल आता जोरदार एन्ट्री करणार आहे.

दक्षिण कोरियन मीडिया 'अजू न्यूज'च्या रिपोर्टनुसार, ॲपलने आपल्या पहिल्या फोल्डेबल आयफोनसाठी सॅमसंग डिस्प्लेकडून तब्बल 2 कोटी पॅनल खरेदी करण्याचं ठरवलं आहे. आधी हा आकडा 1.3 कोटी ते 1.5 कोटी इतका होता. या वाढीव ऑर्डरवरून स्पष्ट होतं की, ग्राहकांकडून या फोनला मोठी मागणी असेल, असा कंपनीचा अंदाज आहे. हा फोन 2026 च्या दुसऱ्या तिमाहीत बाजारात येण्याची शक्यता आहे. सॅमसंग डिस्प्ले मे महिन्यापर्यंत या पॅनलचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करेल आणि मुख्य पुरवठादार असेल, असंही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

फोल्डेबल फोनचं नाव 'आयफोन अल्ट्रा'

या नवीन फोल्डेबल आयफोनचं नाव ‘आयफोन अल्ट्रा’ (iPhone Ultra) असू शकतं, अशी माहिती समोर आली आहे. आधी याला 'आयफोन फोल्ड' असं नाव दिलं जाईल, अशी चर्चा होती. पण आता 'आयफोन अल्ट्रा' नावाची शक्यता जास्त आहे. चीनमध्ये याच्या 256 जीबी बेस मॉडेलची किंमत जवळपास 15,999 युआन (सुमारे 2.14 लाख रुपये) असेल, तर अमेरिकेत याच मॉडेलसाठी सुमारे 1,999 डॉलर (सुमारे 1.84 लाख रुपये) मोजावे लागतील.

या फोनच्या मोठ्या डिस्प्लेवर आयपॅडसारखा अनुभव देण्याचा ॲपलचा प्रयत्न आहे, असंही रिपोर्ट्स सांगतात. एकाच वेळी दोन ॲप्स चालवणं आणि साइडबारद्वारे सहज नेव्हिगेट करणं यासारख्या सुविधा यात असतील. मोठ्या स्क्रीनसाठी ॲप्स अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतील, यासाठी डेव्हलपर्सना मदत करणारी टूल्सही कंपनी तयार करत आहे.

या फोनमध्ये 7.8-इंचाचा आतला आणि 5.5-इंचाचा बाहेरचा डिस्प्ले असेल. यात ड्युअल रिअर कॅमेरा आणि ड्युअल फ्रंट कॅमेरा सेटअप दिला जाईल. पॉवर बटणामध्ये टच आयडी (Touch ID) असण्याचीही शक्यता आहे. दमदार परफॉर्मन्ससाठी यात 2 नॅनोमीटर टेक्नॉलॉजीवर बनवलेला A20 प्रो चिपसेट आणि ॲपलचा स्वतःचा C2 मॉडेम असेल. जास्त किंमत असलेल्या या प्रीमियम फोनमुळे फोल्डेबल मार्केटमध्ये मोठे बदल घडतील, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.