भारती एअरटेलने त्यांच्या ९९९ रुपये आणि त्याहून अधिक किमतीच्या फॅमिली पोस्टपेड प्लॅन्समध्ये मोठा बदल केलाय. आता या प्लॅन्ससोबत ग्राहकांना ॲपल आयक्लाउड प्लस, ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचं सबस्क्रिप्शन एकदम मोफत मिळणार आहे.
मुंबई : भारती एअरटेलने आपल्या फॅमिली पोस्टपेड ग्राहकांसाठी एक भारी ऑफर आणली आहे. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आता एअरटेलच्या फॅमिली प्लॅन्ससोबत ॲपल आयक्लाउड प्लस (Apple iCloud+), ॲपल टीव्ही (Apple TV) आणि ॲपल आर्केड (Apple Arcade) या सर्व्हिसेस मिळणार आहेत. ही नवीन ऑफर ९९९ रुपये आणि त्यापुढील फॅमिली प्लॅन्सवर लागू असेल. यामुळे ग्राहकांना क्लाउड स्टोरेजसाठी आयक्लाउड प्लस, ओरिजिनल सिरीज आणि सिनेमांसाठी ॲपल टीव्ही आणि विना जाहिरात गेमिंगसाठी ॲपल आर्केडचा आनंद घेता येईल.
प्लॅनचे डिटेल्स आणि ॲपल सर्व्हिसेस
"आयक्लाउड प्लसमुळे एअरटेलच्या लाखो पोस्टपेड ग्राहकांना त्यांचे फोटो, फाइल्स, पासवर्ड्स आणि कॉन्टॅक्ट्स त्यांच्या ॲपल डिव्हाइसेसवर सहज स्टोअर आणि सिंक करता येतील," असं कंपनीने स्पष्ट केलंय. ग्राहकांचा डेटा सुरक्षितपणे बॅकअप राहील, जेणेकरून नवीन डिव्हाइस घेताना जुना डेटा सहज ट्रान्सफर करता येईल.
९९९ रुपयांच्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये एका कुटुंबातील तीन सदस्यांना फास्टलेन टेक्नॉलॉजीसह अनलिमिटेड डेटा मिळतो. सोबतच स्पॅम प्रोटेक्शन आणि अनेक एंटरटेनमेंट सबस्क्रिप्शन्सचा फायदाही दिला जातो.
तुम्हाला जर हा प्लॅन घ्यायचा असेल, तर तुम्ही एअरटेल ॲपवरून किंवा जवळच्या एअरटेल स्टोअरमध्ये जाऊन तुमचा प्लॅन सहज अपग्रेड करू शकता.
कंपनीचं काय म्हणणं आहे?
भारती एअरटेलचे मार्केट ऑपरेशन्स डायरेक्टर अमित त्रिपाठी म्हणाले, "ग्राहकांचं आयुष्य सोपं कसं करता येईल आणि त्यांना जास्तीत जास्त फायदा कसा देता येईल, याचा आम्ही नेहमीच विचार करतो. आमचे फॅमिली पोस्टपेड प्लॅन्स याच विचारातून तयार केले आहेत. एकाच प्लॅनमध्ये संपूर्ण कुटुंबाला कनेक्टिव्हिटी, मनोरंजन आणि डिजिटल अनुभव मिळावा हा आमचा उद्देश आहे. आता ॲपलच्या या नवीन सर्व्हिसेस जोडल्यामुळे ग्राहकांना आणखी चांगला अनुभव मिळेल."
शेअर बाजारातील स्थिती
दरम्यान, शेअर बाजारात भारती एअरटेलचे शेअर्स थोडे घसरलेले पाहायला मिळाले. रिपोर्टिंगच्या वेळी एअरटेलचा शेअर १८२०.३० रुपयांवर ट्रेड करत होता. आधीच्या १८३०.२० रुपयांच्या क्लोजिंगच्या तुलनेत यात ९.९० अंकांची (०.५४ टक्के) घसरण नोंदवली गेली.


