- Home
- Sports
- Cricket
- Virat Kohli Retirement : विराट कोहलीचा 2027 चा वर्ल्ड कप शेवटचा असणार, नेमकं काय म्हणाला?
Virat Kohli Retirement : विराट कोहलीचा 2027 चा वर्ल्ड कप शेवटचा असणार, नेमकं काय म्हणाला?
विराट कोहलीने मोठी घोषणा केली आहे. २०२७ चा वनडे वर्ल्ड कप हा आपला शेवटचा वर्ल्ड कप असेल, असं कोहलीने स्पष्ट केलंय. रोहित शर्माही या स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज असल्याचं त्याने सांगितलं. कोहलीच्या रिटायरमेंटच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

वर्ल्ड कप २०२७ बाबत विराट कोहलीची मोठी घोषणा
मुंबई : विराट कोहलीने भारतीय क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का दिलाय. आगामी २०२७ चा आयसीसी मेन्स वनडे वर्ल्ड कप हा भारतासाठी आपला शेवटचा वर्ल्ड कप असेल, असं त्याने स्पष्ट केलंय. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामधील १२ मैदानांवर पुढच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही मेगा स्पर्धा रंगणार आहे. २०११ मध्ये भारतात झालेल्या वर्ल्ड कपमधून कोहलीने आपल्या वनडे वर्ल्ड कप करिअरची सुरुवात केली होती. धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेला हरवून ट्रॉफी जिंकणाऱ्या त्या ऐतिहासिक टीमचा तो भाग होता. आतापर्यंत २०११, २०१५, २०१९ आणि २०२३ असे चार वनडे वर्ल्ड कप खेळलेला 'किंग कोहली' आपला शेवटचा वर्ल्ड कप जिंकूनच निरोप घेण्याच्या तयारीत आहे.

अचानक दिलेलं माईंड ब्लॉकिंग स्टेटमेंट
वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे सिरीजपूर्वी जिओ-हॉटस्टारशी बोलताना कोहलीने आपले प्लॅन्स उघड केले. पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपसाठी आपण आपली पूर्ण ताकद पणाला लावून तयारी करत असल्याचं त्याने सांगितलं. २०२७ ची स्पर्धा ही भारतासाठी आपली शेवटची स्पर्धा असेल आणि ट्रॉफी जिंकणं हेच आपलं एकमेव ध्येय असल्याचं त्याने स्पष्ट केलं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कोणतीही मेहनत घ्यायला तयार असल्याचंही त्याने आवर्जून सांगितलं.
५० ओव्हर्सचा फॉरमॅट म्हणजे सोपी गोष्ट नाही
यावेळी कोहलीने वनडे वर्ल्ड कपचं महत्त्व समजावून सांगितलं. "५० ओव्हर्सच्या वर्ल्ड कपमधील इंटेन्सिटी वेगळ्याच लेव्हलची असते. टी-२० वर्ल्ड कपमध्ये साधारण १० सामने खेळावे लागतात. पण ५० ओव्हर्सच्या फॉरमॅटमध्ये एकाच दिवसात २.५ टी-२० सामन्यांइतकी मेहनत करावी लागते. एवढ्या मोठ्या स्पर्धेत ती इंटेन्सिटी टिकवून ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे," असं तो म्हणाला. शिवाय यावेळी परदेशी खेळपट्ट्यांवर सामने होणार असल्याने जास्त ताकद खर्च होईल, असंही त्याने सांगितलं.
"भारतासाठी हा माझा शेवटचा वर्ल्ड कप आहे आणि हेच मला पुढे जाण्यासाठी मोटिव्हेट करतं. मैदानात माझं बेस्ट देणं आणि कप जिंकणं हेच माझं मुख्य टार्गेट आहे," असं त्याने स्पष्ट केलं. भारतासाठी आतापर्यंत ३१५ वनडे सामने खेळलेल्या विराटने १५०८० रन्स केले आहेत. यात ५५ सेंच्युरीज आणि ७९ हाफ सेंच्युरीजचा समावेश आहे.
वर्ल्ड कप रेकॉर्ड्समध्ये किंगचाच जलवा
वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक रन्स करणाऱ्या बॅटर्सच्या लिस्टमध्ये विराट कोहली दुसऱ्या नंबरवर आहे. एकाच वर्ल्ड कप एडिशनमध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्डही कोहलीच्याच नावावर आहे. २०२३ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये त्याने तब्बल ७६५ रन्स कुटून रेकॉर्ड्सची रांग लावली होती. त्या स्पर्धेत आपल्या भन्नाट बॅटिंगच्या जोरावर त्याने अनेक रेकॉर्ड्स स्वतःच्या नावावर केले.
रोहित शर्माचे प्लॅन्स काय आहेत?
विराट कोहलीसोबतच भारताचा माजी कॅप्टन रोहित शर्मानेही २०२७ चा वनडे वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा यापूर्वीच बोलून दाखवली आहे. आगामी आव्हानांसाठी आपण सज्ज असल्याचं रोहितनेही सांगितलं होतं. "माझं काम संपलंय, असं मला कधीच वाटत नाही. कितीही काळ खेळलो तरी काहीतरी मिळवण्याची भूक असतेच. मी वर्ल्ड कप खेळण्यासाठी आतुरतेने वाट पाहतोय," असं रोहित म्हणाला होता.
आयसीसी टूर्नामेंट्समध्ये वेगवेगळ्या टीम्ससोबत आणि वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर खेळणं हे एक मोठं चॅलेंज असल्याचं त्याने सांगितलं. या दोन दिग्गजांनी २०२७ चा वर्ल्ड कप खेळला, तर तो त्यांच्या वनडे करिअरमधील एक आयकॉनिक क्षण असेल. टी-२० मधून निवृत्ती घेतल्यानंतर, या मेगा स्पर्धेनंतर हे दोघेही वनडेमधूनही रिटायरमेंट घेण्याची दाट शक्यता आहे.

