दिनेश कार्तिकने मोहम्मद शमीच्या टीम इंडियातील पुनरागमनावर मोठं वक्तव्य केलं आहे. भारतीय संघ शमीच्या पुढे निघून गेला असल्याचं तो म्हणाला. तसेच, विराट कोहली आणि रोहित शर्माने वनडे क्रिकेट खेळणं सुरूच ठेवलं पाहिजे, अन्यथा भविष्यात मोठा फटका बसेल, असा इशाराही त्याने दिला.

चेन्नई : टीम इंडियात मोहम्मद शमीच्या कमबॅकबाबत माजी क्रिकेटर दिनेश कार्तिकने दिलेलं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. दुखापत, फिटनेस आणि इतर कारणांमुळे शमीने २०२५ मध्ये भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो दमदार कामगिरी करत असला तरी, राष्ट्रीय संघात परतण्याची त्याची आशा आता धूसर होताना दिसत आहे.

बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर बदलले तरी शमीला पुन्हा संघात आणण्यात काहीच अर्थ नाही, असं कार्तिकला वाटतं. भारतीय संघ आधीच शमीला सोडून खूप पुढे गेला आहे. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका २-१ ने जिंकली असली तरी, संघाची कामगिरी फारशी खास नव्हती. असं असलं तरी, या परिस्थितीत शमीला पुन्हा संघात घेणं हा योग्य निर्णय ठरणार नाही, असा कार्तिकचा दावा आहे.

नेमकं काय म्हणाला दिनेश कार्तिक?

"नाही, मला वाटतं संघात इतरही उत्तम वेगवान गोलंदाज आहेत. भारत शमीच्या पुढे निघून गेला आहे. आता पुन्हा मागे जाण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे शमी कितीही भारी गोलंदाजी करत असला तरी, मी त्याच्याबद्दल विचार करत नाही," असं कार्तिक म्हणाला. सध्या अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा हे वेगवान गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र आहेत. यासोबतच गुरनूर ब्रार, आकिब नबी आणि अंशुल कंबोज यांसारख्या युवा टॅलेंटलाही संधी मिळत आहे.

रोहित-विराटला कार्तिकचा पाठिंबा

याचवेळी, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टीम इंडियासाठी खेळणं सुरूच ठेवावं, अशी आशा कार्तिकने व्यक्त केली आहे. पुढच्या वर्षीच्या विश्वचषकानंतर या दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती घेतली, तर वनडे क्रिकेटचं भविष्य धोक्यात येईल, असा इशारा त्याने दिला आहे. "ते दोघे जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठी नावं आहेत. जागतिक क्रिकेटचं केंद्र असलेल्या भारतातून दोन महान खेळाडू बाहेर पडले, तर त्याचा नक्कीच मोठा परिणाम होईल," असं कार्तिकने स्पष्ट केलं.

टीम इंडियाचा रन मशीन विराट कोहलीने आधीच स्पष्ट केलं आहे की, २०२७ चा वनडे विश्वचषक ही त्याची शेवटची आयसीसी स्पर्धा असेल. तर हिटमॅन रोहित शर्मा २०२७ च्या वनडे विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये खेळत राहील की नाही, याबाबत शंका आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने आधीच आंतरराष्ट्रीय टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून, ते आता फक्त वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करत आहेत.