जपानमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने इराणचा ३७-३४ असा थरारक पराभव करत सुवर्णपदक कायम राखलं आहे. पुष्पा राणाच्या नेतृत्वाखालील टीमने ५ पैकी ४ आशियाई स्पर्धांमध्ये गोल्ड जिंकून आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केलाय.
टोकियो : जपानच्या आयची प्रीफेक्चरमधील टोकाई सिटीझन्स जिम्नॅशियममध्ये शनिवारी, २६ सप्टेंबरला एक थरारक सामना रंगला. या मॅचमध्ये भारतीय महिला कबड्डी संघाने इराणला धूळ चारत आशियाई क्रिडा स्पर्धेतील आपलं सुवर्णपदक यशस्वीपणे कायम राखलं आहे.
कॅप्टन पुष्पा राणाच्या नेतृत्वात 'वुमेन इन ब्लू'ने इराणचा ३७-३४ असा पराभव केला. याआधी २०२३ मध्ये हांगझोऊ इथं झालेल्या स्पर्धेतही भारतानेच गोल्ड जिंकलं होतं. भारतासाठी हा विजय सोपा नव्हता. पहिल्या हाफमध्ये पिछाडीवर पडलेल्या इराणने जोरदार कमबॅकचा प्रयत्न केला, पण आपल्या चॅम्पियन टीमने संयम राखत हातातून निसटणारा विजय खेचून आणला.
ग्रुप स्टेजपासूनच भारताचा दबदबा पाहायला मिळाला. 'ग्रुप ए' मध्ये इराण, बांगलादेश आणि यजमान जपानला हरवल्यानंतर, सेमीफायनलमध्ये नेपाळला आस्मान दाखवत भारताने सलग पाचव्यांदा आशियाई स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली होती.
५ आशियाई स्पर्धा आणि ४ सुवर्णपदकं
कबड्डीचा विषय निघतो, तेव्हा भारताचं नाव नेहमीच आघाडीवर असतं. भारताने फक्त या खेळाला प्रमोटच केलं नाही, तर त्याला ग्लोबल लेव्हलवर नेऊन ठेवलंय. १९९० मध्ये जेव्हा आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीचा अधिकृत समावेश झाला, तेव्हापासून पुरुष संघाने या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळीच ओळख मिळवून दिली.
२०१0 मध्ये पहिल्यांदाच महिला कबड्डीचा आशियाई स्पर्धेत समावेश झाला. तेव्हापासून भारतीय महिलांनी आपल्या ताकदीच्या आणि जबरदस्त रणनीतीच्या जोरावर या खेळात पूर्णपणे वर्चस्व गाजवलं आहे. २०१० च्या ग्वांगझोऊ स्पर्धेत महिला कबड्डीचं पहिलं सुवर्णपदक जिंकण्याचा मानही भारतानेच मिळवला होता.
त्यानंतर भारतीय टीम सलग चार वेळा फायनलमध्ये पोहोचली. फक्त २०१८ च्या जकार्ता स्पर्धेत त्यांना इराणकडून अटीतटीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता. पण या टीमने खचून न जाता २०२२ च्या हांगझोऊ गेम्समध्ये (जे २०२३ मध्ये झाले) पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकलं. आणि आता आयची-नागोयामध्ये इराणलाच हरवून आपलं विजेतेपद दिमाखात कायम राखलं.
इराणविरुद्धचा हा सामना भारतासाठी अजिबात सोपा नव्हता. पण शेवटच्या काही मिनिटांत भारतीय खेळाडूंनी जो संयम दाखवला, तोच निर्णायक ठरला. यामुळेच पोडियमवर पुन्हा एकदा भारताचा तिरंगा डौलाने फडकला आणि देशाच्या कबड्डीच्या सुवर्ण इतिहासात आणखी एका पानाची भर पडली.
२०१० पासून आशियाई स्पर्धेत भारतीय टीमची एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे कठीण प्रसंगातून जोरदार कमबॅक करण्याची त्यांची ताकद. मोठ्या स्टेजवरही त्यांचं प्लॅनिंग एकदम परफेक्ट असतं. २०२२ च्या जकार्ता गेम्समध्ये चायनीज तैपेईविरुद्धचा विजय याचं उत्तम उदाहरण आहे, जिथे भारताने २६-२५ अशा अटीतटीच्या फरकाने सुवर्णपदक खिशात घातलं होतं.
भारतीय महिला कबड्डी टीमची ऐतिहासिक कामगिरी
भारताच्या क्रीडा इतिहासात महिला कबड्डी टीमने नेहमीच आपलं वर्चस्व गाजवलं आहे. आशियाई स्तरावर त्यांनी कायमच नवे रेकॉर्ड्स सेट केलेत. ५ पैकी ४ आशियाई स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल जिंकणं, हे देशाचा कबड्डीतला दबदबा आणि खेळाडूंच्या जिद्दीचं उत्तम उदाहरण आहे.
आशियाई स्पर्धेतील चार सुवर्णपदकांव्यतिरिक्त, भारतीय महिला कबड्डी संघाने २०१२ आणि २०२५ मध्ये दोन वर्ल्ड कप जिंकले आहेत. तसंच आशियाई कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये (२००५, २००७, २००८, २०१७ आणि २०२५) पाच सुवर्णपदकं, दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (२००६, २०१०, २०१६ आणि २०१९) चार सुवर्णपदकं आणि आशियाई बीच गेम्समध्ये (२००८, २०१०, २०१२, २०१४ आणि २०१६) सलग पाच सुवर्णपदकं पटकावली आहेत.

याशिवाय, भारतीय महिला कबड्डी टीमने सर्कल वर्ल्ड कपमध्येही (२०१३, २०१४ आणि २०१६) तीन सुवर्णपदकं जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा सिद्ध केलाय. आता या वर्षी ऑक्टोबरमध्ये गुजरातच्या अहमदाबादमध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ कबड्डी चॅम्पियनशिपमध्येही भारतीय महिला आपला हाच फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील.
२०३० मध्ये अहमदाबादमध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये कबड्डीचा समावेश व्हावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळी भारतीय टीमचं हे यश कबड्डीची ग्लोबल लेव्हलवर वाढती क्रेझ दाखवून देतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर आधीच एवढं मोठं यश मिळवलेली आपली महिला कबड्डी टीम आता आपला हाच सुवर्ण इतिहास आणखी भक्कम करण्यासाठी सज्ज झाली आहे.


