Australia Defeats England by 5 Wickets : ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात शतक झळकावणारा ट्रॅव्हिस हेड सामनावीर ठरला. पाच कसोटी सामन्यांमध्ये ३१ विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क मालिकावीर ठरला.
Australia Defeats England by 5 Wickets : अॅशेस मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातही इंग्लंडचा पराभव झाला. सिडनी येथे झालेल्या शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पाच विकेट्सनी विजय मिळवत पाच सामन्यांची मालिका ४-१ ने जिंकली. शेवटच्या दिवशी ३०२-८ धावसंख्येवरून पुढे खेळताना इंग्लंडने आणखी ४० धावांची भर घालून ३४२ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात १६० धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने पाच विकेट्स गमावून पूर्ण केले. १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला १२१-५ अशा स्थितीत आणून इंग्लंडने दबाव निर्माण केला होता, पण अॅलेक्स कॅरी (१६*) आणि कॅमेरॉन ग्रीन (२२*) यांनी ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. स्कोअर: इंग्लंड ३८४, ३४२, ऑस्ट्रेलिया ५६७, १६१/५.
ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात शतक झळकावणारा ट्रॅव्हिस हेड सामनावीर ठरला. पाच कसोटी सामन्यांमध्ये ३१ विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क मालिकावीर ठरला. ऑस्ट्रेलियाचा हा सलग पाचवा अॅशेस मालिका विजय आहे. मालिकेतील पहिले तीन कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने अॅशेसवर कब्जा कायम ठेवला, तर चौथ्या कसोटीतील विजय हा इंग्लंडसाठी एकमेव दिलासा ठरला.
शेवटच्या दिवशी चमत्काराची अपेक्षा करणाऱ्या इंग्लंडला सुरुवातीलाच शतकवीर जेकब बेथेलची विकेट गमवावी लागली. १४२ धावांवरून खेळायला उतरलेला बेथेल आणखी १० धावांची भर घालून १५२ धावांवर मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर अॅलेक्स कॅरीकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर जोश टंगला (६) देखील स्टार्कने बाद केल्याने इंग्लंडचा संघर्ष संपला. मॅथ्यू पॉट १८ धावांवर नाबाद राहिला. १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेड (२९) आणि जेक वेदरॉल्ड (३४) यांनी चांगली सुरुवात केली. सलामीच्या विकेटसाठी दोघांनी ६२ धावांची भागीदारी केली.
जोश टंगने हेडला बाद करून ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर जेक वेदरॉल्डलाही (३४) टंगनेच बाद केले. कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि आपला निरोपाचा कसोटी सामना खेळणारा उस्मान ख्वाजा (६) हे देखील लवकरच बाद झाले. धावसंख्या १२१ असताना लॅबुशेन (३७) बाद झाल्याने इंग्लंडच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, पण ग्रीन आणि कॅरी यांनी त्या धुळीस मिळवल्या.


