Gold Hallmark Scam : हॉलमार्क बघून सोनं घेताय? ते फेक असू शकतं, या 5 गोष्टी नक्की तपासा
सोनं घेताना फक्त हॉलमार्क बघितला की काम झालं, असं अनेकांना वाटतं. पण खरी गोम इथेच आहे. सध्या बाजारात फेक हॉलमार्कचा सुळसुळाट झालाय. या फसवणुकीपासून स्वतःला कसं वाचवायचं?

सोनं घेताना घ्यायची काळजी
सोनं घेताना आपण सगळ्यात आधी हॉलमार्क बघतो. पण फक्त हॉलमार्क आणि HUID नंबर दिसला म्हणून डोळे झाकून विश्वास ठेवू नका. सध्या राजस्थान, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये फेक हॉलमार्क सेंटर्सचा पर्दाफाश झालाय. भामटे लोक कमी शुद्धतेच्या दागिन्यांवर ओरिजिनल HUID नंबर टाकतात. त्यामुळे BIS CARE ॲपवर नंबर खरा दिसतो, पण सोनं मात्र हलक्या दर्जाचं असतं. असं होऊ नये म्हणून काय करायचं, ते पुढे बघा.

BIS सर्टिफाईड ज्वेलर्सकडून खरेदी
तुम्ही नेहमी BIS सर्टिफाईड ज्वेलर्सकडूनच सोनं खरेदी करा. यामुळे सोन्याच्या शुद्धतेची खात्री मिळते. बिलावर सोन्याचं वजन, शुद्धता आणि किंमत स्पष्ट लिहिलेली असते. भविष्यात सोनं मोडताना किंवा बदलताना हेच बिल आणि हॉलमार्क तुमच्या कामी येतो.
HUID नंबर तपासा
दागिन्यांवरचा HUID नंबर BIS CARE ॲपवर टाकून नक्की चेक करा. पण फक्त नंबर दिसला म्हणून थांबू नका. ॲपवर दिसणारी माहिती आणि तुमच्या हातातला दागिना मॅच होतोय का, ते बघा. दागिन्यावरचा HUID, प्युरिटी मार्क आणि रजिस्ट्रेशन नंबर बरोबर असल्याची खात्री करा.
सोन्याची शुद्धता
हॉलमार्कसोबतच सोन्याची शुद्धता तपासणं खूप महत्त्वाचं आहे. 22 कॅरेट सोन्यावर 22K916, 18 कॅरेटवर 18K750 आणि 14 कॅरेटवर 14K585 असे मार्क असतात. दागिन्यावर हा प्युरिटी मार्क नक्की बघा. काही व्यापारी कमी शुद्धतेचं सोनं जास्त कॅरेटचं सांगून विकतात, यात तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.
पक्कं बिल मागा
सोनं घेताना पक्कं बिल घेणं मस्ट आहे. बिलावर दागिन्याचं वजन, शुद्धता आणि किंमत स्पष्ट असली पाहिजे. 'बिल नको, तुम्हाला कमी भावात देतो' असं कोणी म्हणत असेल, तर तिथून सोनं घेऊ नका. सोन्याइतकेच त्याचे कागदपत्रंही महत्त्वाचे असतात.
दागिन्यांचे फोटो
हॉलमार्क, HUID किंवा बिलामध्ये काही गडबड वाटली, तर तुम्ही BIS मान्यताप्राप्त हॉलमार्क सेंटरमध्ये सोन्याची टेस्ट करू शकता. तसंच, BIS केअर ॲपवर दागिन्यांचे HD फोटोही दिसतात. पण सध्या ही फोटो शेअरिंगची सुविधा देशभरातल्या फक्त 25 हॉलमार्क सेंटर्समध्येच उपलब्ध आहे.

