Bhandup Road LBS Marg : भांडुपमध्ये रस्ता खचल्याची घटना घडली आहे. भर पावसात रस्ता खचल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबई : मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसात भांडुपमध्ये रस्ता खचल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. खचलेल्या रस्त्यात भलामोठा खड्डा तयार झाला. या खड्ड्यात एक टेंपो पडला, त्यानंतर एक मोठं झाडंही त्या खड्ड्यात कोसळून पडलं. या घटनेनंतर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

भांडुपमधील एलबीएस मार्ग येथील एशियन पेंट कंपनीसमोर शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास रस्ता खचला. एलबीएस मार्गाजवळ एका इमारतीचं बांधकाम सुरू होतं. याच बांधकामामुळे तिथे खोदकाम करण्यात आलं होतं. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात आज शनिवारी खोदकाम केलेल्या ठिकाणची जमीन अचानक खचली. रस्त्यावर उभा असलेला टेम्पो याच खचलेल्या रस्त्यात कोसळला. त्यानंतर या रस्त्यालगत असलेली झाडंही या खचलेल्या भागात उन्मळून पडली.
भर पावसात रस्ता खचल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तसंच परिसरात वाहतूककोंडीही झाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. त्यानंतर मदतकार्य सुरू करण्यात आलं. या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती.

