शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्या मते शरद पवार लवकरच दुसऱ्या पक्षात प्रवेश करू शकतात आणि सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होऊ शकतात. रोहित पवारांना शरद पवारांच्या वेगळ्या दिशेची जाणीव असल्याचेही त्यांनी म्हटले. शिरसाटांच्या मते मविआ फार काळ टिकणार नाही.

मुंबई: शिवसेनेचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा भविष्यवाणी करत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार लवकरच दुसऱ्या पक्षात प्रवेश करू शकतात, तर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री म्हणून झळकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

"राजकारणात काहीही अशक्य नाही"

एका खास मुलाखतीत शिरसाट म्हणाले, "राजकारणात काहीही शक्य आहे. सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्री होण्याची इच्छा नवी नाही, आणि ती लवकरच पूर्ण होऊ शकते." या विधानाने दिल्लीत आणि महाराष्ट्रात राजकीय चर्चा तापल्या आहेत.

"पवारांच्या वाटा वेगळ्या, अजित पवार आधीच गेलेत"

शिरसाट पुढे म्हणाले, "रोहित पवारांना माहिती आहे की आपले आजोबा म्हणजेच शरद पवार वेगळी दिशा घेत आहेत. काका आधीच दुसऱ्या गोटात गेलेत. सुप्रिया सुळे पंतप्रधान मोदींसोबत परदेश दौऱ्यावर आहेत हेही काहीतरी सूचित करतं."

"महाविकास आघाडी आता पचणार नाही"

शिरसाटांचा स्पष्ट इशारा "महाविकास आघाडीसोबत शरद पवार फार काळ टिकणार नाहीत. हे नातं आता संपुष्टात येणार आहे. येत्या महिन्याभरात मोठ्या घडामोडी पाहायला मिळतील." त्यांच्या माहितीनुसार, "या महिन्याच्या अखेरीस शरद पवार महायुतीत सामील होणार नाहीत, पण पुढच्या महिन्यात १५ तारखेपर्यंत मोठ्या उलथापालथी घडतील."

"सुप्रिया सुळे केंद्रात झळकू शकतात"

यावर अधिक बोलताना शिरसाट म्हणाले, “सुप्रिया सुळे यांची केंद्रात मंत्री होण्याची इच्छा लपलेली नाही. ती इच्छा आता प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा वेळी तडजोड करणं राजकारणाचा भाग असतो.” 

शरद पवारांचे पुढचे पाऊल, सुप्रिया सुळेंचा दिल्लीकडे झुकाव आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गत हालचालींनी महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठवलं आहे. संजय शिरसाटांच्या भाकितांमध्ये किती तथ्य आहे, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. पण एक मात्र नक्की पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे!