Dark Sky Park : महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाने रचला इतिहास, देशातील पहिले 'डार्क स्काय पार्क' म्हणून घोषणा

| Published : Jan 12 2024, 06:03 PM IST / Updated: Jan 12 2024, 07:06 PM IST

 Pench National Park Nagpur

सार

Pench Tiger Reserve : महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प देशातील पहिले डार्क स्काय पार्क म्हणून घोषित करण्यात आले आहे. खगोलप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे.

Pench Tiger Reserve : महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाला (Pench Tiger Reserve) भेट देणाऱ्या पर्टकांना आता रात्रीच्या वेळेस अवकाशात घडणाऱ्या घटना पाहण्याची संधी मिळणार आहे. कारण नुकतेच इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन या संस्थेतर्फे ‘पेंच व्याघ्र प्रकल्प’ देशातील पहिले डार्क स्काय पार्क (Dark Sky Park) म्हणून घोषित करण्यात आले आहे. 

या घोषणेनंतर पेंच प्रकल्प (Pench Tiger Reserve) परिसरामध्ये वॉच टॉवरही उभारण्यात आला आहे. जेथे पर्यटक टेलिस्कॉपच्या मदतीने अवकाशातील घटना पाहू शकतात. महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाला 'इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क' म्हणून मान्यता मिळाल्यानंतर हे आशियातील पाचवे डार्क स्काय पार्क' (Dark Sky Park) ठरले आहे.

इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन ही एक अशी संस्था आहे, जी जगभरातील अशा पद्धतीच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करते. याच कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पास (Pench Tiger Reserve) मान्यता देण्यात आली आहे. पेंचमधील सिलारी परिसरातील वाघोली नावाच्या गावामध्ये वॉच टॉवर उभारण्यात आला आहे. या परिसरात रात्रीच्या वेळेस प्रकाश अतिशय कमी प्रमाणात असतो. 

येथे दुर्बिणीचा वापर न करताच आकाशातील तारे सहजरित्या दिसू शकतात. त्यामुळे अशा परिस्थितीत जर उच्च क्षमतेच्या दुर्बिणीद्वारे ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचाली पाहायला मिळाल्यास हा एक अद्भुत अनुभव असेल.

"आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल प्रकल्पाचे नाव"

पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक प्रभू नाथ शुक्ला यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी संवाद साधताना म्हटले की, “वाघांची ही भूमी आता विश्वाचे रहस्य उलगडू पाहणाऱ्या खगोलप्रेमींना प्रेरित करेल. इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशनने पेंच व्याघ्र प्रकल्पाला दिलेल्या या मान्यतेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रकल्पाचे नाव पोहोचणार आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाने भारतातील पहिले व आशियातील पाचवे ‘डार्क स्काय पार्क’चा मान पटकावला आहे.”

पेंचमध्ये उभारली वेधशाळा

डार्क स्काय पार्कचा (Dark Sky Park) दर्जा मिळवण्यासाठी पेंचमध्ये जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून वेधशाळा उभारण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सिलारी बफर झोनपासून 3 किलोमीटर अंतरावर वाघोली येथील संरक्षण टॉवरवर एक दुर्बीण बसवण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे येथे एक वेधशाळा आधीपासूनच अस्तित्वात आहे. या सोयीसुविधांमुळे देशभरातील खगोलप्रेमींसाठी अवकाशातील रहस्यांचा अभ्यास करण्यासाठी उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

विविध उपाययोजना

यासोबतच प्रकाशाचे प्रदूषण कमी करण्यासाठीही येथे विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. प्रकल्प व्यवस्थापनाने पवनी बफर क्षेत्राच्या आसपासच्या 100हून अधिक गावांमधील पथदिवे बदलले आहेत. हे दिवे जमिनीच्या दिशेने तोंड करून बसवण्यात आले आहेत. म्हणजेच दिव्यांमधून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाची दिशा बदलण्यात आली आहे. यामुळे रात्रीच्या काळोखावर याचा कमी परिणाम होतो आणि पर्यटकांनाही तारे पाहण्याचा चांगला अनुभव मिळतो.

आणखी वाचा

Kalaram Temple : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळाराम मंदिराचे घेतले दर्शन, प्रभू श्री रामाच्या भक्तीत झाले तल्लीन

Deep Clean Campaign : स्वच्छतेची मोहीम अखंडीतपणे सुरू ठेवा, मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

Vibrant Gujarat Global Summit 2024 : सार्वजनिक मंचावर भाष्य न करणाऱ्या UAEच्या अध्यक्षांनी भारत व PM मोदींच्या सन्मानार्थ केले भाषण