नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बोरखेडी स्टेशनजवळ झालेल्या या हल्ल्यात ट्रेनच्या काचा फुटल्या. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही, पण रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
नागपूर : तुम्ही ट्रेनने शांतपणे प्रवास करत आहात आणि अचानक गोळीबारासारखा आवाज होऊन खिडकीची काच अंगावर फुटून पडली तर? साहजिकच कुणाचीही घाबरगुंडी उडेल. सध्या सोशल मीडियावर असाच एक थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसमध्ये घडली आहे. भारतात, विशेषतः रात्रीच्या वेळी ट्रेनवर होणाऱ्या हल्ल्यांची ही ताजी घटना आहे.
अचानक फुटल्या खिडकीच्या काचा
गेल्या शुक्रवारी रात्री बोरखेडी स्टेशन ओलांडल्यानंतर नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीत खिडकीची काच फुटल्याचा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. भारतात, विशेषतः उत्तर भारतात ट्रेनने प्रवास करताना कधीही हल्ला होऊ शकतो, अशी भीती आता प्रवाशांच्या मनात निर्माण झाली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एखाद्या गोळीबारासारखी काच फुटते आणि प्रवाशांच्या अंगावर उडते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
'मशीनगन'सारखा भयानक आवाज
प्रवासी रात्रीचे जेवण करत असतानाच अचानक एका मोठ्या आवाजासह खिडकीची काच फुटली. काचेचे तुकडे थेट कोचमध्ये उडाले, पण सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाल्याचे वृत्त नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये प्रवासी या प्रकाराने किती घाबरले आहेत, हे स्पष्ट दिसते. काही प्रवाशांनी तर हा आवाज थेट 'मशीनगनमधून गोळी झाडल्यासारखा' होता, असे सांगितले.
गुन्हा दाखल, तपास सुरू
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात एक्सप्रेसच्या A-1, B-2 आणि B-5 या कोचच्या खिडक्यांचे नुकसान झाले आहे. रात्री साधारण ८.२७ च्या सुमारास बाहेरून दगड किंवा एखादी जड वस्तू खिडकीवर आदळल्याचे एस्कॉर्ट कर्मचारी आणि प्रवाशांनी सांगितले. माहिती मिळताच रात्री ८.४६ च्या सुमारास RPF आणि GRP अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बोरखेडी-सिंदी सेक्शनसह जवळच्या बोरखेडी आणि ब्राह्मणी गावांमध्ये शोधमोहीम राबवली. मात्र, अद्याप कोणताही संशयित व्यक्ती किंवा ठोस पुरावा हाती लागलेला नाही. या हल्ल्याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलम १५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खिडकीवर नेमकी कुठून आणि कोणती वस्तू फेकण्यात आली, याचा कसून तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

