सार
Maharashtra Vidhan Parishad Election : विधानपरिषदेसाठी विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे.
Maharashtra Vidhan Parishad Election : लोकसभा निवडणुकानंतर पहिलीच मोठी निवडणूक होत असून विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी सकाळपासूनच मतदान सुरू झाले आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहोचली असून कोणाची विकेट निघणार याबाबत गुरुवारी तर्कवितर्क लढविले जात होते. आपापली मते फुटू नयेत यासाठी सर्व पक्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असले तरी क्रॉसव्होटिंग होण्याची आणि धक्कादायक निकालाची नोंद होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये, शिवसेना उद्धव ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांच्या विजयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी विशेष खबरदारी घेतली असून आपल्या आमदारांची गेल्या दोन दिवसांपासून चांगलीच खातरदारी केल्याचे पाहायला मिळाले आहे.
विधानपरिषदेसाठी विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी, सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानपरिषदेसाठी एकूण 274 आमदारांचं मतदान होणार असून दुपारी 3 वाजता सर्वच 274 आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे सध्या तुरुंगात असलेल्या आमदार गणपत गायकवाड यांना मतदानाचा हक्क बजावता येणार की नाही, याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर निवडणूक आयोगानेही त्यांना मतदान करण्याची परवानगी दिल्यानंतर त्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सर्वात शेवटी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
महायुतीचे मतदान
भाजप आणि अपक्ष मिळून - 108 आमदार मतदान झाले
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 40 आणि दोन अपक्ष अशा एकूण 42 आमदार यांनी मतदान केले
शिवसेना शिंदे गटाचे एकूण 38 आमदार असून त्यांना 7 अपक्ष आणि बच्चू कडू यांचे 2 अशा 9 आमदारांचं समर्थन असल्यानं त्यांचे संख्याबळ 47 होते. शिंदेंच्याही सर्व आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. दरम्यान, मनसेचे राजु पाटील व बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांचे दुपारनंतरही बाकी होते, अखेर राजू पाटील व बहुजन विकास आघाडीच्या आमदारांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.
महाविकास आघाडीचे मतदान
काँग्रेसच्या सर्व 37 आमदारांनी आज मतदान केले. त्यानंतर काँग्रेस आमदार कैलास गोरांट्याल यांची शायरी
रातभर दिल की धडकने जारी रहती है
सोते नहीं है हम
जिम्मेदारी रहती है
शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील सर्व आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क आहे
शिवसेना उद्धव ठाकरेंच्या सर्व आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे.
हे उमेदवार आहेत रिंगणात
भाजप: पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर
शिंदेसेना: भावना गवळी, कृपाल तुमाने
अजित पवार गट : राजेश विटेकर, शिवाजी गर्जे
काँग्रेस: प्रज्ञा सातव
उद्धवसेना : मिलिंद नार्वेकर
शेकाप : जयंत पाटील
मतांची समीकरणे कशी?
भाजपला आपले पाचही उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास असला तरी पहिल्या पसंतीची तीन मते त्यांना कमी पडतात.
शिंदेसेनेचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे 39 आमदार असून त्यांना 10 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याने ते सुस्थितीत आहेत.
शेकापचे जयंत पाटील यांच्या स्वतःच्या पक्षाचे एकच आमदार आहेत. त्यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला असून त्यांचे 15 आमदार आहेत. याचा अर्थ जयंत पाटील यांच्याकडे 16 मते आहेत. त्यांना आणखी 7 मतांची जुळवाजुळव करावी लागेल.
अजित पवार गटाचे 39 आमदार आहेत. त्यांना आणखी 7 मते लागतील. काही अपक्ष, लहान पक्ष आणि काँग्रेसमधील तीन मतांच्या भरवशावर त्यांचे गणित जुळेल, असे म्हटले जात आहे. तर, उद्धवसेनेकडे 15 आमदार आहेत, त्यांना आणखी ८ मते हवी आहेत.
काँग्रेसची मते निर्णायक
काँग्रेसची मते या निवडणुकीत सर्वात महत्त्वाची आहेत. त्यांच्याकडे 37 मते आहेत आणि त्यांच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची केवळ 23 मते लागतील. याचा अर्थ काँग्रेसकडे 14 मते अतिरिक्त आहेत, ती कुठे वळतात यावर बरेच अवलंबून असेल.
काँग्रेसचे 4 जण क्रॉस व्होटिंग करतील
काँग्रेसमधील तीन ते चार आमदार क्रॉस व्होटिंग करतील, असे भाकीत उमेदवार व शेकाप नेते जयंत पाटील यांनी वर्तविले. हे आमदार कोण आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. ते केवळ तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये आहेत, मनाने काँग्रेससोबत नाहीत, असेही पाटील म्हणाले.
आणखी वाचा :