कोकणातील शिवसेना आमदार भास्करराव जाधव यांनी आपल्या घरातील काम करणाऱ्या सुप्रिया पाटील हिच्या लग्नात भावनिक क्षण अनुभवले. 8 वर्षांपासून त्यांच्या घरी काम करणाऱ्या सुप्रियाला त्यांनी आपली मुलगी मानले असून तिच्या पाठवणीच्या वेळी जाधव कुटुंब भावूक झाले.

गुहागर, रत्नागिरी: कोकणातील आक्रमक, स्पष्टवक्त्या आणि तुफान जनाधार असलेल्या शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव हे नाव नेहमीच राजकीय वर्तुळात कणखर नेतृत्वाचं प्रतीक म्हणून घेतलं जातं. अधिवेशन असो वा पत्रकार परिषद आपल्या रोखठोक शैलीनं सभागृह दणाणणारे भास्करराव राजकारणात जितके परखड, तितकेच मनानेही हळवे असल्याचं नुकत्याच एका प्रसंगातून दिसून आलं.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

गुहागरमधील पांगारी गावातील सडेवाडीत एका विवाहसोहळ्याचं निमित्त होतं. लग्नाची लगबग सुरू असताना, तिथे अचानक भास्करराव जाधव आपल्या संपूर्ण कुटुंबासह दाखल झाले. या घरगुती सोहळ्यात ते अगदी आपुलकीनं सहभागी झाले आणि पाहता पाहता घरातल्यासारखेच रुळून गेले.

ही वधू सुप्रिया पाटील भास्कररावांच्या घरी मागील ८ वर्षांपासून काम करत होती. तिचा प्रामाणिकपणा, मनमिळाऊ स्वभाव आणि सतत कामात रमलेली वृत्ती पाहून जाधव कुटुंबानं तिला केवळ एक नोकरवर्गातील व्यक्ती म्हणून न पाहता आपलीच एक मुलगी मानलं. त्या भावनेचं प्रतिबिंब त्या दिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात उतरलं.

सुप्रियाच्या पाठवणीची वेळ येताच, जिथं एकीकडे वऱ्हाडातील लोक आनंदात होते, तिथं दुसरीकडे जाधव कुटुंब भावनांनी ओथंबून गेलं. सुप्रियानं जाधवांच्या पत्नी आणि सुनेला मिठी मारताच तिचे अश्रू आवरले नाहीत आणि त्याच क्षणी, नेहमीचे खंबीर, मुलुखमैदानी भास्कररावही ढसाढसा रडायला लागले!

त्यांनी सुप्रियाच्या पती आणि सासरच्या मंडळींसमोर उभं राहून मोठ्या अभिमानानं सांगितलं “सुप्रिया आमच्यासाठी केवळ घरात काम करणारी नव्हती, ती आमचीच लेक आहे. ही लक्ष्मी आता तुमच्या घरी येते आहे तिचा सन्मान करा, प्रेम द्या.”

हे बोलतानाही भास्कररावांचे डोळे पाणावले. त्यांनी सुप्रियाला प्रेमानं पाठीवरून हात फिरवत सुखी संसारासाठी आशीर्वाद दिला. तो क्षण उपस्थित प्रत्येकाच्या मनात कायमचा कोरला गेला.