शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. 6 खासादारांनी आपला वेगळा गट बनवला असून त्यांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटल्याने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे गटाचे खासदारांनी वेगळा गट बनवल्याने त्यांचा शिंदे गटात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खासदारांच्या या बंडखोरीला मात्र खासदार संजय राऊत यांनी विरोध केला आहे. संजय राऊत हे ओम बिर्ला यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. अरविंद सावंत हे देखील त्यांच्यासोबत आहेत. ऑपरेशन टायगरची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. जी आज खरी ठरली आहे. कालच आम्ही बातमी दिली होती की, ठाकरे गटाचे 6 खासदार वेगळा गट स्थापन करणार आहेत.

कोण आहेत ते 6 खासदार?
नागेश पाटील आष्टीकर, संजय उत्तमराव देशमुख, ओमराजे निंबाळकर, संजय (बंडू) जाधव, संजय दीना पाटील, भाऊसाहेब राजाराम वाकचौरे या 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. जे आता शिंदे गटात जाणार आहेत. तर अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे ठाकरे गटातच आहेत.
अरविंद सावंत यांनी म्हटले की, आम्हाला कोणीही काहीही माहिती दिली नाही. आम्ही ओम बिर्ला यांची भेट घेणार आहोत. आम्ही त्यांना पत्र देखील लिहिले आहे. संविधानाची चेष्टा केली जात आहे.
संजय राऊत यांची टीका
संजय राऊत यांनी यावरुन टीका केली आहे. संजय राऊत यांनी म्हटले की, ज्यांना जायचे आहे त्यांनी राजीनामा देऊन जावे. आमच्या मतदारांनी तुम्हाला विजयी केले आहे. त्यामुळे तुम्ही असे सोडून जाऊ शकत नाहीत. 14 तारखेला बैठकीत सगळ्यांनी सांगितले होते की, ते पक्षासोबतच आहेत.
दुसरीकडे गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी सूत्र स्वीकारल्यापासून अधोगती सुरु झाल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
ठाकरे गट सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे. 6 खासदारांच्या गटाला मान्यता दिल्याने या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे. या निर्णयाला ते आव्हान देणार आहेत. 6 बंडखोर खासदार रात्रीच दिल्लीत दाखल झाले होते. तर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत या खासदारांची बैठक घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.
