Ajit Pawar Death News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले आहे. या दुःखद घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, पवार कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुःखात बुडाला आहे. 

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर, शिस्तप्रिय आणि लढवय्या नेतृत्व आज काळाने हिरावून घेतले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाल्याची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. ही घटना कुणालाही विश्वास बसणार नाही अशी असून, “ही बातमी खोटी ठरावी” अशीच भावना सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत होते. मात्र, बारामती विमानतळावर उतरण्यापूर्वीच सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या माळरानावर विमान कोसळले. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील अन्य पाच जणांचा मृत्यू झाला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

राजकीय वर्तुळात शोककळा, कार्यकर्ते अश्रूंनी गहिवरले

अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. संपूर्ण पक्षात शोककळा पसरली आहे. अपघाताच्या वेळी युगेंद्र पवार वगळता पवार कुटुंबातील सर्व सदस्य दिल्ली येथे होते. घटनेची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंब बारामतीत दाखल झाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी “सगळं उद्ध्वस्त झालं” असा भावनिक संदेश आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसमधून व्यक्त केला, तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

रुग्णालयाबाहेर जनसागर, बारामतीत शोकाकुल वातावरण

अपघातानंतर अजित पवार यांचे पार्थिव बारामती येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयाबाहेर हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून, अनेक जण अक्षरशः ढसाढसा रडताना दिसत आहेत. पोलिसांकडून गर्दी नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, राज्याच्या विविध भागांतून नेते, पदाधिकारी आणि लाखो कार्यकर्ते बारामतीकडे रवाना होत असल्याचे चित्र आहे. अजित पवार यांच्यावर असलेले जनतेचे प्रेम आणि त्यांची प्रचंड लोकप्रियता लक्षात घेता, त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन मोठ्या प्रमाणात लोकांना घेता यावे यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात व्यवस्था करण्यात आली आहे.

अंत्यदर्शन व अंत्ययात्रेची सविस्तर माहिती

विद्या प्रतिष्ठानचे ट्रस्टी किरण गुजर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, आज दुपारी 4 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत विद्या प्रतिष्ठान विद्यानगरी चौक येथील मैदानात अजित पवार यांचे पार्थिव नागरिकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. उद्या सकाळी 9 वाजता गदिमा सभागृह येथून अंत्ययात्रा निघणार आहे. ही अंत्ययात्रा गदिमा सभागृह, विद्यानगरी चौक, बिघून रोड सेवा रस्ता, विद्या प्रतिष्ठानचा रस्ता, मराठी शाळेच्या गेटमार्गे पुन्हा विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात येईल. उद्या सकाळी 11 वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंतिम संस्कार होणार आहेत.

अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अनुभवी, कणखर आणि जनतेशी थेट नातं असलेला नेता गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.