World Heritage Day 2024 : पर्यटकांचे आकर्षण वेरूळचे कैलास शिल्प,जाणून घ्या कैलास शिल्प आणि त्याचे वैशिष्ट्ये

| Published : Apr 11 2024, 07:00 AM IST

World-Heritage-Day-2024
World Heritage Day 2024 : पर्यटकांचे आकर्षण वेरूळचे कैलास शिल्प,जाणून घ्या कैलास शिल्प आणि त्याचे वैशिष्ट्ये
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

युनेस्कोच्या भारताच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत वेरूळचं नाव हे पहिल्या पाच स्थळांमध्ये येतं.या मंदिराची निर्मिती ही 'आधी कळस मग पाया', या तत्त्वावर केली गेली आहे.एकसंध खडकातून कोरण्यात आलेलं हे लेणं कैलास शिल्प,जाणून घ्या  त्याचे वैशिष्ट्ये. 

 

World Heritage Day 2024 : युनेस्कोच्या भारताच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत वेरूळचं नाव हे पहिल्या पाच स्थळांमध्ये येतं.या मंदिराची निर्मिती ही 'आधी कळस मग पाया', या तत्त्वावर केली गेली आहे. भारतातील सगळ्या लेणी या एकतर खालून वर, नाही तर डोंगरफोडून समोरून आत अशा कोरलेल्या आहेत. मात्र कैलास मंदिराची निर्मिती अतिशय नियोजनबद्धपणे कळसापासून पायापर्यंत करण्यात आली आहे. हे मंदिर बनवण्यासाठी साधारण 150 वर्षं लागली असावी असे जाणकार सांगतात.

हिमालयातील पांढऱ्या बर्फाप्रमाणे मंदिराला लेप :

हिमालयातील पांढऱ्या शुभ्र बर्फामध्ये कैलास पर्वतावर महादेवाचे वास्तव्य आहे, असं हिंदू पुराणांमध्ये म्हटलंय. त्यानुसार हे मंदिर जेव्हा पूर्ण झालं तेव्हा त्याला पांढऱ्या रंगाचा लेप लावण्यात आला होता. मात्र आता हा लेप काळाच्या ओघात निघून गेला आहे. तरीही काही ठिकाणी आपल्याला याचे अंश बघायला मिळतात.कैलास मंदिर निर्माण करताना एका मोठ्या शिळेला तीन भागांमध्ये वरून खालपर्यंत खोदण्यात आलं. या खोदकामात जवळपास 20 हजार टन दगड फोडून वेगळा करण्यात आला. लेणीच्या मध्यभागी जे मुख्य मंदिर आहे त्यामध्ये वरच्या बाजूला एक मोठे शिवलिंग आहे.या शिवलिंगाच्या समोर मोठा महामंडप आहे. या महामंडपात अनेक मोठमोठे, सुंदर कोरीवकाम असलेले स्तंभ आहेत. तर मंदिराच्या छताच्या आतल्या बाजूस भगवान शिवाचं तांडव नृत्य करणारं शिल्प कोरण्यात आलं आहे.तसंच मंदिराच्या शिखरावर पाच सिंह कोरण्यात आले आहेत. आपण महाबलीपुरम येथे पाहिलं तर तिथेही सिंह, हत्ती कोरलेले आहेत. मात्र इथे कैलास मंदिरात हे प्राणी पूर्णाकृती रूपात पाहायला मिळतात. या संपूर्ण मंदिराची बांधणी एखाद्या रथाप्रमाणे असून हे मंदिर व्याळ आणि हत्ती यांसाख्या प्राण्यांनी डोक्यावर उचललेलं आहे.हे मंदिर म्हणजे दक्षिण आणि उत्तर वास्तु स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. इथे समोरच्या बाजूला पाहीलं तर तुम्हाला गोपुरं दिसतात, तर पाठीमागच्या बाजूला शिखर दिसतात. तसंच या मंदिराच्या समोरील दोन्ही बाजूस दोन हत्ती आणि दोन ध्वजस्तंभ कोरलेले आहेत.

कैलास लेणे मंदिरातील अद्वितीय शिल्पे : 

कैलास लेण्यामध्ये अनेक देवी-देवतांची अद्वितीय शिल्पे आहेत. या लेण्यांमध्ये कमळाच्या फुलावर विराजमान गणेश, महिषासुर मर्दिनी, शिव, विष्णू, इंद्र, नरसिंह, वराह, त्रिविक्रम, ब्रह्मा, गजलक्ष्मी यांची शिल्पे आहेत. उत्तरेकडील भिंतीवर गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमाचे शिल्प अतिशय सुंदर आहे. कैलासनाथ मंदिराची भव्य रचना आतून आणि बाहेरून शिल्पांनी सजलेली आहे. यात छायांकन योजनेचा नयनरम्य प्रभाव आहे. कैलास गुहेच्या मंदिराच्या संरचनेत गर्भगृह, गर्भगृह, मंडपम आणि थोड्या अंतरावर नंदी मंडपम यांचा समावेश आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उजवीकडे डाव्या बाजूला यमुना आणि गंगा या दोन नद्यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. कैलास मंदिराच्या उत्तरेकडील भिंतीवर महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. दक्षिणेकडील भिंतीवर रामायणातील शिल्पे आहेत.

तीन धर्म संस्कृतींचे दर्शन घडवते वेरूळ 

वेरूळ परिसरात एकूण 34 लेण्या आहेत. यामध्ये लेणी क्र 1 ते 12 हे बौद्ध संस्कृती, लेणी क्र 12 ते 30 हिंदू संस्कृती तर लेणी क्र 31 34 जैन संस्कृतीचे दर्शन घडते. जगामध्ये या तीन संस्कृतीचे एकत्र दर्शन घडवणारे वेरूळ लेणी ही एकच आहे. सह्याद्री पर्वत रांगांमध्ये डेसॉल्ट दगडात या सर्व कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. द्रविडीयन पद्धतीत साकारण्यात आलेल्या लेण्यांची निर्मिती इ.स 600 ते 1000 या काळात निर्माण झाल्याचे सांगितले जाते. व्यापारी मार्गावर असल्याने या लेण्या पहिल्यापासूनच प्रसिद्धी झोतात होत्या. धर्म वाढवण्यासाठी लेण्यांच्या माध्यमातून त्याकाळी प्रचार केला जात होता. त्यातूनच या लेण्यांची निर्मिती झाली असे जाणकार सांगतात.