हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी काही वस्तू फ्री असतात. त्या वापरल्यानंतर तुम्ही घरी नेऊ शकता. पण रूममधील प्रत्येक गोष्ट तुमची नसते. ती नेल्यास चोरी मानली जाते. मग कोणत्या वस्तू न्यायच्या आणि कोणत्या नाही?
मुंबई : फिरायला गेल्यावर हॉटेलमध्ये राहणे सर्वांनाच आवडते. मऊ गादी, सुंदर रूम, स्वच्छ बाथरूम आणि ग्राहकांसाठी असलेल्या सुविधांमुळे हॉटेलमधील मुक्काम भारी वाटतो. पण चेक आऊट करताना हॉटेल रूममधील कोणत्या वस्तू घरी न्यायच्या, असा प्रश्न अनेकांना पडतो. काही जण छोट्या वस्तू बॅगेत टाकतात, तर काही जण काय न्यायचे हे माहीत नसल्याने सर्व तिथेच सोडून देतात.
हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी ठेवलेल्या काही वस्तू फ्री असतात. त्या वापरल्यानंतर घरी नेण्याची परवानगी असते. पण रूममधील सर्वच वस्तू तुमच्या मालकीच्या नसतात. त्यामुळे काय न्यायचे आणि काय तिथेच सोडायचे, हे माहीत असणे गरजेचे आहे.
हॉटेल रूममधून घरी नेण्यासारख्या वस्तू कोणत्या?
१. शॅम्पू, साबण आणि लोशन
हॉटेलच्या बाथरूममध्ये ग्राहकांसाठी छोट्या बाटल्यांमध्ये शॅम्पू, कंडिशनर, साबण आणि बॉडी लोशन ठेवलेले असते. या वस्तू वैयक्तिक वापरासाठी असतात आणि त्या घरी नेण्याची परवानगी असते. पण काही हॉटेल्समध्ये भिंतीवर मोठ्या बाटल्या लावलेल्या असतात. त्या तुम्ही नेऊ शकत नाही.
२. टूथब्रश आणि टूथपेस्ट
प्रवाशांच्या सोयीसाठी हॉटेल्स टूथब्रश, टूथपेस्ट, रेझर आणि कंगवा यांसारख्या वस्तू देतात. या 'युज अँड थ्रो' वस्तू असल्याने तुम्ही त्या घरी नेऊ शकता.
३. युज अँड थ्रो चपला
काही मोठ्या हॉटेल्समध्ये ग्राहकांसाठी मऊ चपला (स्लिपर्स) ठेवलेल्या असतात. या एकाच व्यक्तीच्या वापरासाठी असतात. हॉटेलच्या नियमानुसार, चेक आऊट करताना तुम्ही या चपला सोबत नेऊ शकता.
४. चहा, कॉफी आणि साखरेचे पाकीट
हॉटेल रूममध्ये टी बॅग, कॉफी पावडर, साखरेची पाकिटे आणि हॉट चॉकलेट मिक्स ठेवलेले असते. या वस्तू ग्राहकांसाठी फ्री असतात आणि त्या नेण्यास परवानगी असते. पण मिनीबारमधील विकतचे खाद्यपदार्थ किंवा पेये फ्री समजू नका.
५. सीलबंद पाण्याची बाटली
काही हॉटेल्समध्ये ग्राहकांना पिण्याच्या पाण्यासाठी फ्री बाटल्या दिल्या जातात. त्या फ्री असतील तर तुम्ही सोबत नेऊ शकता. पण मिनीबारमधील पाण्याच्या बाटल्यांसाठी पैसे मोजावे लागतात. त्यामुळे आधी खात्री करणे चांगले.
६. नोटपॅड, पेन आणि पेन्सिल
हॉटेलचा लोगो असलेले नोटपॅड, पेन किंवा पेन्सिल ग्राहकांना दिली जाते. या वस्तू जाहिरातीसाठी किंवा वापरासाठी असतात. साधारणपणे या वस्तू घरी नेण्यास परवानगी असते.
या वस्तू चुकूनही सोबत नेऊ नका -
हॉटेल रूममध्ये दिसणाऱ्या सर्वच वस्तू फ्री नसतात. हेअर ड्रायर, उशा, बेडशीट, टॉवेल, पडदे, दिवे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि सजावटीचे सामान ही हॉटेलची मालमत्ता असते. परवानगीशिवाय या वस्तू नेणे चोरी मानले जाते. अशा प्रकरणात हॉटेल तुमच्याकडून दंड वसूल करू शकते आणि कायदेशीर कारवाईही करू शकते.
चेक आऊट करण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा -
हॉटेलमधून घरी नेण्यासारख्या वस्तूंचे नियम सगळीकडे सारखे नसतात. हॉटेलचा दर्जा आणि नियमांनुसार यात बदल असू शकतो. त्यामुळे एखाद्या वस्तूबद्दल शंका असल्यास, ती घेण्यापूर्वी हॉटेल स्टाफला विचारणे केव्हाही चांगले.
प्रवासाची आठवण म्हणून शॅम्पूची छोटी बाटली, टी बॅग किंवा हॉटेलचा लोगो असलेले पेन घरी आणण्यात काहीच गैर नाही. पण हॉटेलची मालमत्ता स्वतःची समजून नेणे चुकीचे आहे. हे छोटे नियम पाळल्यास तुमचा प्रवास सुखकर होईल आणि विनाकारण होणारा त्रास टळेल.




