भारतात बहुतांश ठिकाणी २० ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे. यंदाची विजयादशमीची नेमकी तारीख, दशमी तिथी, शुभ मुहूर्त आणि रावण दहनाची वेळ जाणून घ्या.
मुंबई : वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक असलेला दसरा म्हणजेच विजयादशमी हा हिंदू धर्मातील एक मोठा सण आहे. मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी हा सण साजरा केला जाईल. या दिवशी पूजा, लोककला आणि रावण दहन होतं. पण यंदा दशमी तिथी २१ ऑक्टोबरपर्यंत असल्याने दसरा नेमका कधी साजरा करायचा, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दसरा २०२६ - तारीख आणि शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार, २० ऑक्टोबरला दुपारी १२:५० वाजता दशमी तिथी सुरू होईल आणि ती २१ ऑक्टोबरला दुपारी २:११ वाजेपर्यंत राहील. त्यामुळे मुख्य दसरा २० ऑक्टोबरलाच साजरा केला जाईल.
- विजय मुहूर्त - २० ऑक्टोबर, दुपारी १:५९ ते २:४५ पर्यंत
- प्रदोष काळ - २० ऑक्टोबर, संध्याकाळी ५:४७ पासून सुरू
- रावण दहन - संध्याकाळी प्रदोष काळात (५:४७ नंतर) रावण दहन केलं जाईल.
स्थानिक वेळेनुसार या मुहूर्तांमध्ये थोडा बदल होऊ शकतो. त्यामुळे पूजा करण्यापूर्वी तुमच्याकडचं पंचांग नक्की तपासा.
दसरा का साजरा करतात?
प्रभू रामचंद्रांनी रावणावर मिळवलेला विजय म्हणून आपण दसरा साजरा करतो. काही ठिकाणी देवी दुर्गेने महिषासुराचा वध केल्याचा आनंद म्हणूनही हा सण पाळला जातो. रावण दहन करणं म्हणजे आपल्यातील अहंकार, लोभ, राग आणि इतर वाईट गुणांना जाळून टाकणं होय.
भारतातील वेगवेगळ्या राज्यांत दसरा
देशातील अनेक भागांमध्ये रामलीला आणि रावण दहन मोठ्या उत्साहात होतं. पश्चिम बंगालमध्ये विजयादशमीच्या दिवशी दुर्गा पुजेची सांगता होते. यावेळी देवीला निरोप देताना महिला 'सिंदूर खेला'चा आनंद लुटतात.






