US-Iran Conflict: अमेरिकेच्या नौदलाच्या एका पाणबुडीने श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ आंतरराष्ट्रीय समुद्रात एका इराणी युद्धनौकेवर टॉर्पेडोने हल्ला करून तिला बुडवलं आहे. पेंटागॉनने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
अमेरिकेच्या नौदलाच्या एका पाणबुडीने मंगळवारी रात्री उशिरा श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ एका इराणी युद्धनौकेवर टॉर्पेडोने हल्ला करून तिला बुडवलं आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षातील ही एक मोठी आणि नाट्यमय घडामोड मानली जात आहे.
हेगसेथ यांनी सांगितलं की, श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत असलेल्या एका इराणी फ्रिगेटला (लढाऊ जहाजाला) लक्ष्य करण्यात आलं.
"एका अमेरिकन पाणबुडीने इराणी युद्धनौकेला बुडवलं. आंतरराष्ट्रीय समुद्रात आपण सुरक्षित आहोत, असं त्यांना वाटत होतं. पण त्याऐवजी, एका टॉर्पेडोने त्यांना बुडवलं," असं सांगत हेगसेथ यांनी या हल्ल्याची जबाबदारी थेट अमेरिकेने घेतली असल्याचं स्पष्ट केलं.
श्रीलंकेच्या उप परराष्ट्र मंत्र्यांच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या या पाणबुडी हल्ल्यात कमीत कमी ८० जणांचा मृत्यू झाला आहे. याआधी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, त्यांनी IRIS Dena या फ्रिगेटमधून ३२ क्रू मेंबर्सना वाचवलं आहे, पण इतर १४८ खलाशी बेपत्ता आहेत आणि त्यांच्या जिवंत सापडण्याची आशा फारच कमी आहे.
मध्य पूर्वेपासून खूप दूर झालेला हल्ला
आतापर्यंत हा संघर्ष प्रामुख्याने मध्य पूर्वेपुरता मर्यादित होता, पण हा हल्ला त्या भागापासून हजारो किलोमीटर दूर, श्रीलंकेच्या दक्षिणेकडील व्यस्त सागरी मार्गाजवळ झाला आहे.
हेगसेथ यांनी या हल्ल्याला 'शांत मृत्यू' (quiet death) असं संबोधलं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने पहिल्यांदाच टॉर्पेडो वापरून शत्रूचं जहाज बुडवलं आहे.
ते म्हणाले, "त्या युद्धाप्रमाणेच, आम्ही जिंकण्यासाठी लढत आहोत."
पेंटागॉनच्या म्हणण्यानुसार, शनिवारी इराणविरोधात अमेरिका आणि इस्रायलने सुरू केलेल्या युद्धाचा एक मुख्य उद्देश इराणच्या नौदलाला पूर्णपणे संपवणे हा आहे.
पहाटेच्या आधी आलेला मदतीसाठी कॉल
बुधवारी पहाटे ५ वाजून ८ मिनिटांनी श्रीलंकेच्या तटरक्षक दलाला एक आपत्कालीन संदेश (distress signal) मिळाला आणि त्यानंतर श्रीलंका या संकटात ओढला गेला.
परराष्ट्र मंत्री विजिथा हेरथ यांनी सांगितलं की, हा कॉल इराणी जहाज 'आयआरआयएस डेना' (Iris Dena) वरून आला होता आणि जहाजावरील कर्मचाऱ्यांनी एका स्फोटाची माहिती दिली होती.
हेरथ म्हणाले, "सकाळी ६ वाजेपर्यंत आम्ही एक नौदल जहाज पाठवलं आणि ७ वाजेपर्यंत दुसरं जहाजही रवाना केलं." आंतरराष्ट्रीय सागरी शोध आणि बचाव नियमांनुसार प्रतिसाद देणं श्रीलंकेसाठी बंधनकारक होतं, असंही त्यांनी नमूद केलं.
ही घटना श्रीलंकेच्या दक्षिणेकडील शहर गालेपासून सुमारे ४४ नॉटिकल मैल (८१ किलोमीटर) अंतरावर घडली. हे ठिकाण श्रीलंकेच्या सागरी हद्दीबाहेर पण त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रात (exclusive economic zone) येतं.
एक आधुनिक युद्धनौका गमावली
इराणच्या नौदलाच्या ताफ्यातील 'आयआरआयएस डेना' ही सर्वात नवीन फ्रिगेट्सपैकी एक होती. जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रं, अँटी-शिप मिसाइल्स, टॉर्पेडो लाँचर्स, तोफा आणि मशीन गनने ती सुसज्ज होती. इराणच्या सागरी क्षमतेसाठी हे एक महत्त्वाचं जहाज होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, हे जहाज गेल्या आठवड्यात भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यूमधून परतत असताना त्यावर हल्ला झाला असावा.
वाढता जागतिक तणाव
अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात संयुक्त कारवाई सुरू केल्यानंतर हा पाणबुडी हल्ला झाला आहे. विश्लेषकांच्या मते, या हल्ल्यामुळे संघर्षाचं क्षेत्र विस्तारलं असून हिंदी महासागरातील जागतिक शिपिंग मार्गांच्या सुरक्षेबद्दल चिंता वाढली आहे. हा एक धोकादायक टप्पा ठरू शकतो.
जगातील सर्वात व्यस्त सागरी मार्गांवर वसलेल्या श्रीलंकेसाठी, जागतिक सत्तासंघर्ष किती लवकर आपल्या सागरी हद्दीत येऊ शकतो, हे या घटनेने दाखवून दिलं आहे.
(एएफपीच्या इनपुट्ससह)


