९३ वर्षांचे वृद्ध पती आपल्या पत्नीला मंगळसूत्र घेण्यासाठी ज्वेलरी शॉपमध्ये गेले. त्यांच्या प्रेमाने भावुक झालेल्या दुकान मालकाने त्यांना मंगळसूत्र मोफत दिले.
Maharashtra Old Couple Viral Video: ९३ वर्षांच्या वृद्ध पतीचं आपल्या पत्नीवर असलेलं प्रेम पाहून ज्वेलरी शॉपचा मालक इतका भावूक झाला की त्याने सोन्याचं मंगळसूत्र मोफत देऊन टाकलं. हा भावनिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.
पत्नीसाठी सोन्याचं मंगळसूत्र खरेदी करण्याची इच्छा कधीच कमी झाली नव्हती. वयाची ९३ वर्षं गाठूनही एका वृद्ध पतीने आपल्या पत्नीला मंगळसूत्र द्यावं म्हणून थेट ज्वेलरी दुकान गाठलं. पांढरी धोतर-कुर्ता आणि टोपी असा पारंपरिक वेश घालून ते आपल्या वृद्ध पत्नीला घेऊन जेव्हा दुकानात आले, तेव्हा दुकानातील कर्मचाऱ्यांना वाटलं की कदाचित मदतीसाठी आले असावेत. पण जेव्हा त्यांनी मंगळसूत्र खरेदी करायची इच्छा व्यक्त केली, तेव्हा तिथे उपस्थित सगळेच भावूक झाले.
ना त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती चांगली होती, ना वय पण पत्नीसाठी मंगळसूत्र घ्यायचं हे स्वप्न मात्र त्यांनी उराशी बाळगलं होतं. महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एका ज्वेलरी शॉपमध्ये घडलेला हा प्रसंग सध्या सोशल मीडियावर लोकांच्या डोळ्यांत अश्रू आणत आहे.
पत्नीसाठी घ्यायचं होतं सोन्याचं मंगळसूत्र
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतं की एक वृद्ध दांपत्य ‘गोपिका ज्वेलर्स’मध्ये प्रवेश करतं. पारंपरिक पोशाखातले ९३ वर्षांचे वृद्ध दुकानात येतात आणि हळू आवाजात सांगतात की ते आपल्या वृद्ध पत्नीसाठी मंगळसूत्र विकत घ्यायला आले आहेत. हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटतं. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या दुकान मालकाला त्यांच्या डोळ्यांत फक्त गरिबी नाही, तर एकमेकांवरील अपार प्रेम दिसतं.
सोन्याच्या मंगळसूत्राच्या बदल्यात घेतलं फक्त आशीर्वाद
जेव्हा दुकान मालकाने त्यांना सोन्याचं मंगळसूत्र आणि पेंडंट दिलं, तेव्हा त्या वृद्धांनी लगेच खिशातून पैसे काढून द्यायचा प्रयत्न केला. कोणतीही नोटांची गड्डी नव्हती, फक्त काही मोजके पैसे होते. आणि पाहूनच लक्षात येत होतं की हे पैसे त्यांनी फार मेहनतीनं आणि बचतीनं जमा केले होते, पत्नीचं छोटं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. हे ऐकून वृद्ध दांपत्याच्या डोळ्यांत आनंदाचे आणि प्रेमाचे अश्रू आले. त्यांच्या चेहऱ्यावर असलेला समाधान आणि आत्मियतेचा भाव शब्दांत व्यक्त करता येणार नाही.
कोण आहेत हे वृद्ध दांपत्य?
या वृद्धांचा नाव निवृत्ती शिंदे असून त्यांची पत्नी शांताबाई. हे दोघं जालना जिल्ह्यातील अंभोरा जहागीर गावचे रहिवासी असून एक सामान्य शेतकरी कुटुंबातून आहेत. सध्या ते पंढरपूरच्या आषाढी एकादशी वारीसाठी पायी प्रवास करत आहेत.
दुकान मालकाने काय सांगितलं?
दुकान मालकाने सांगितलं, "ते दांपत्य दुकानात आलं आणि वृद्धांनी सांगितलं की ते आपल्या पत्नीसाठी मंगळसूत्र विकत घ्यायचं आहे. त्यांनी मला ११२० रुपये दिले. पण त्यांच्या प्रेमामुळे मी इतका भारावून गेलो की मी फक्त २० रुपये घेतले आणि त्यांना मंगळसूत्र देऊन टाकलं."
हा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ आतापर्यंत २ कोटींपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला असून, सगळीकडे या वृद्ध पतीच्या प्रेमाचं कौतुक होत आहे. तसंच, ज्वेलरी शॉपच्या मालकाचाही लोक भरभरून सन्मान करत आहेत.


