Plastic Stool Hole : प्लास्टिकच्या स्टूलमधलं भोक फक्त डिझाइनसाठी नसतं. स्टूल एकावर एक ठेवल्यावर व्हॅक्यूम तयार होऊ नये, ते सहज वेगळे करता यावेत, पाण्याचा निचरा व्हावा आणि स्टूल मजबूत राहावा यासाठी हे भोक खूप महत्त्वाचं काम करतं.

मुंबई : आपल्या घरात, दुकानात, हॉटेलमध्ये, कार्यक्रमात... सगळीकडे प्लास्टिकची स्टूल दिसतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का, की या स्टूलच्या बरोबर मधोमध एक गोल भोक, होल का असतं? अनेकांना वाटतं की ही फक्त एक डिझाइन आहे किंवा स्टूल उचलायला सोपं जावं म्हणून ही सोय केली आहे. पण खरं तर या लहानशा भोकाचे अनेक उपयोग आहेत.

याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे स्टूल एकावर एक रचून ठेवल्यावर ते एकमेकांना चिकटू नयेत. जागा वाचवण्यासाठी अनेकदा स्टूल एकमेकांवर रचून ठेवले जातात. जर स्टूलचा पृष्ठभाग पूर्णपणे सपाट असता, तर दोन स्टूलमध्ये अडकलेल्या हवेमुळे व्हॅक्यूम (Suction) तयार झाला असता आणि ते वेगळं करणं खूप अवघड गेलं असतं. हे भोक हवा खेळती ठेवतं, ज्यामुळे व्हॅक्यूम तयार होत नाही आणि गरजेनुसार स्टूल सहज वेगळं करता येतात.

हे भोक स्टूलच्या स्ट्रक्चरल डिझाइनचा (structural layout) एक महत्त्वाचा भाग असू शकतं. काहींना वाटेल की भोक केल्यामुळे स्टूल कमकुवत होतं, पण तसं नाहीये. उलट, विचारपूर्वक तयार केलेलं हे भोक स्टूलवरील दाब सगळीकडे पसरायला मदत करतं. जेव्हा कुणी स्टूलवर बसतं, तेव्हा त्या व्यक्तीचं वजन स्टूलच्या पायांवर विभागलं जातं. हे भोक वजन एकाच ठिकाणी जमा होण्याऐवजी ते सगळीकडे सारख्या प्रमाणात पसरायला मदत करतं. अर्थात, प्रत्येक भोकामुळे स्टूल मजबूत होतोच असं नाही. हे स्टूलच्या एकूण डिझाइनवर अवलंबून असतं.

या भोकाचा आणखी एक सोपा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे पाण्याचा निचरा. स्टूल बाहेर किंवा बाथरूममध्ये वापरल्यास किंवा धुतल्यावर त्यावर पाणी साचू शकतं. या भोकामुळे पाणी सहज वाहून जातं. यामुळे स्टूल स्वच्छ करणं आणि सुकवणं सोपं होतं, विशेषतः जेव्हा एकाच वेळी अनेक स्टूल धुवून ठेवायचे असतात.

प्लास्टिकची स्टूल बनवतात कशी?

प्लास्टिकची स्टूल 'इंजेक्शन मोल्डिंग' (Injection Moulding) नावाच्या प्रक्रियेने बनवली जातात. यात वितळलेलं प्लास्टिक एका साच्यात (Mould) ओतून थंड केलं जातं. जर स्टूलचा पृष्ठभाग पूर्णपणे सपाट आणि भरीव असेल, तर थंड होताना प्लास्टिक वाकडं-तिकडं होऊ शकतं किंवा आकुंचन पावतं. हे टाळण्यासाठी आणि स्टूलला मजबुती देण्यासाठी डिझाइनर त्यात भोक, वेगवेगळ्या जाडीच्या भिंती आणि सपोर्टिंग रिब्स (Reinforcing Ribs) वापरतात.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मटेरियलची बचत. ही स्टूल खूप मोठ्या प्रमाणात बनवली जातात. त्यामुळे प्रत्येक स्टूलमागे थोडं जरी प्लास्टिक वाचवलं, तरी कंपनीचे मोठे पैसे वाचतात. मधोमध भोक देऊन अनावश्यक प्लास्टिक काढून टाकलं जातं, पण स्टूलची मजबुती कायम ठेवली जाते.