- Home
- lifestyle
- Science Of Mirror : आरशात उजवी बाजू डावी आणि डावी बाजू उजवी का दिसते? यामागचं खरं विज्ञान काय?
Science Of Mirror : आरशात उजवी बाजू डावी आणि डावी बाजू उजवी का दिसते? यामागचं खरं विज्ञान काय?
Facts: आपल्यापैकी अनेक जण रोज आरशात आपला चेहरा पाहतात. पण तुम्ही कधी एक गोष्ट नोटीस केली आहे का? आरशासमोर उभा राहून आपला उजवा हात वर केला तर समोरील प्रतिबिंब डावा हात वर करतं. यामागचं नेमकं वैज्ञानिक रहस्य काय आहे?

आरसा खरंच उजवी आणि डावी बाजू बदलतो का?
आपल्याला सहसा असं वाटतं की आरसा आपली उजवी बाजू डावी आणि डावी बाजू उजवीकडे दाखवतो. पण वैज्ञानिकदृष्ट्या पाहायचं झालं तर, आरसा उजवी आणि डावी दिशा बदलत नाही. तो आपल्यासमोरील वस्तूमधून येणारा प्रकाश परावर्तित करून परत आपल्या डोळ्यांकडे पाठवतो. या प्रक्रियेत आपल्याला दिसणारं प्रतिबिंब आपल्यासमोर उभ्या असलेल्या व्यक्तीसारखं वाटतं.
उदाहरणार्थ... तुम्ही तुमचा उजवा हात वर केल्यास, आरशातील व्यक्तीही तिचा डावा हात वर करत असल्याचं आपल्याला वाटतं. खरं तर आरशाने तुमच्या हाताची जागा बदललेली नसते. समोर दुसरी व्यक्ती उभी आहे, अशी आपण कल्पना केल्यामुळे हा बदल झाल्यासारखं वाटतं. म्हणजे ही आरशाची कोणतीही जादू नाही.. आपण प्रतिबिंब कसं समजून घेतो, यावर ती गोष्ट अवलंबून असते.

आरसा पुढून मागच्या बाजूनेच का परावर्तित करतो?
याचं मुख्य कारण म्हणजे प्रकाश परावर्तित होण्याची पद्धत. आपल्या आजूबाजूच्या वस्तूंवर पडणारा प्रकाश पुन्हा वेगवेगळ्या दिशांनी प्रवास करतो. जेव्हा तो प्रकाश आपल्या चेहऱ्यावरून किंवा वस्तूंवरून आरशावर पडतो, तेव्हा आरसा तो पुन्हा परावर्तित करतो. हा प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचल्यामुळे आपल्याला आरशात प्रतिबिंब दिसतं. इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. आरसा आपल्यासमोरील दिशा मागे फिरवल्यासारखी दाखवतो. म्हणजेच आरशासमोरील वस्तूच्या पुढच्या आणि मागच्या दिशांमध्ये बदल दिसतो. पण तो वर, खाली किंवा उजवीकडे, डावीकडे असा कोणताही बदल करत नाही. वैज्ञानिक भाषेत याला लॅटरल इन्व्हर्जन (Lateral Inversion) असं म्हणतात. यालाच मराठीत पार्श्व परिवर्तन म्हणतात. सहसा आपल्याला आरशाने उजवी आणि डावी बाजू बदलल्यासारखी वाटण्यामागचं हेच प्रमुख कारण आहे.
आरशात अक्षरं उलटी का दिसतात?
तुम्ही कधी आरशासमोर उभं राहून एखादं पुस्तक किंवा अक्षरांचा बोर्ड दाखवला आहे का? तेव्हा त्यातील अक्षरं उलटी दिसतात. उदाहरणार्थ 'AMBULANCE' हा शब्द रुग्णवाहिकेच्या पुढच्या बाजूला आरशात बरोबर वाचता यावा म्हणून उलटा लिहून ठेवलेला असतो. यामुळे पुढून जाणाऱ्या वाहनांच्या चालकांना त्यांच्या रिअर व्ह्यू मिररमध्ये (Rear View Mirror) तो शब्द बरोबर वाचता येतो. आरशात अक्षरं उलटी होण्यालाही प्रकाश परावर्तित होण्याची पद्धतच कारणीभूत असते. मुळात आरसा अक्षरं वेगळी बदलत नाही. जेव्हा एखादं अक्षर किंवा शब्द आरशासमोर ठेवला जातो, तेव्हा त्याच्या पुढच्या आणि मागच्या दिशेतील बदलामुळे अक्षरांचा आकार उलटा झाल्यासारखा दिसतो. म्हणूनच सामान्यतः लिहिलेले शब्द आरशात वाचायला कठीण जातात.
आरशाबद्दल आणखी काही रंजक गोष्टी
आरसा ही केवळ आपला चेहरा पाहण्यासाठी वापरली जाणारी वस्तू नाही. त्यामागे अनेक वैज्ञानिक तथ्यं आहेत.
आरशात प्रतिबिंब किती अंतरावर दिसतं?
जर तुम्ही आरशासमोर एक फूट अंतरावर उभे राहिलात, तर तुमचं प्रतिबिंबही आरशामागे एक फूट अंतरावर असल्याचं दिसतं. याला व्हर्च्युअल इमेज (Virtual Image) म्हणतात. प्रत्यक्षात आरशाच्या मागे तुमचं प्रतिबिंब नसतं. प्रकाशाच्या प्रवासाच्या दिशेचा आपला मेंदू अंदाज लावत असल्याने ते तिथे असल्याचं भासतं.
दोन आरसे समोरासमोर ठेवले तर काय होतं?
जर दोन आरसे एकमेकांसमोर ठेवले तर एकाचं प्रतिबिंब दुसऱ्यात वारंवार दिसतं. अशी अनेक प्रतिबिंबं तयार होतात. म्हणूनच आरशांच्या मध्ये उभं राहिल्यावर न संपणाऱ्या बोगद्यासारखं दृश्य तयार होतं.
आरसा फुटल्यावर प्रतिबिंब तुकड्यांमध्ये का वाटलं जातं?
जेव्हा आरसा फुटतो, तेव्हा प्रत्येक तुकड्यात प्रकाश परावर्तित करण्याची क्षमता असते. पण फुटलेले तुकडे वेगवेगळ्या कोनात असल्यामुळे प्रत्येक तुकड्यात आपल्या चेहऱ्याचे वेगवेगळे भाग दिसतात. म्हणूनच एकच चेहरा अनेक तुकड्यांमध्ये विभागल्यासारखा दिसतो.
