सार
Konkan Kunkeshwar Mandir History : कोकणात फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. कोकणाला लाभलेला निळाशार समुद्र, नाराळाची झाडे आणि येथील मंदिरे पाहण्यासारखी आहेत. अशातच कोकणातील कुणकेश्वर मंदिराचा इतिहास तुम्हाला माहितेय का?
Kunkeshwar Mandir History : कुणकेश्वर मंदिर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याच्या कुणकेश्वर गावात समुद्रकिनारी वसले आहे. कुणकेश्वराचे मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे त्याचबरोबर एक तीर्थक्षेत्र आणि एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी स्थित मंदिर हे फार वर्षांपूर्वीचे अतिप्राचीन शंकराचे मंदिर आहे. कुणकेश्वर या प्राचीन मंदिराचा स्कंद पुराणात व संगमेश्वर महात्म्यात उल्लेख केल्याचा आढळून येतो. कुणकेश्वर मंदिर हे कोकणातील एकमेव प्राचीन आणि भव्य मंदिर आहे. कुणकेश्वर मंदिराला दक्षिण कोकणाची काशी असे देखील म्हटले जाते.
पौराणिक महत्व
असे मानले जाते कि, या मंदिराला कोकणच्या दक्षिण काशीचे स्वरूप देण्यामागे पांडवांचा खूप मोठा सहभाग होता. बारा वर्षांचा वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास भोगत असताना, पांडव कुणकेश्वर मंदिरापाशी येऊन पोहचले. हे मंदिर व मंदिराच्या आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पाहून त्यांना काशी विश्वेश्वराचे स्मरण झाले.
पांडव जेव्हा कुणकेश्वर मंदिराच्या ठिकाणी आले तेव्हा त्यांनी शंकर महादेवाला प्रसन्न करण्यासाठी मंदिरालगतच्या समुद्रात एका रात्रीत 21 शिवलिंगांची प्रतिष्ठापना केली होती. आजही समुद्राला येणाऱ्या ओहोटीच्या वेळी हि 21 शिवलिंगे पाहण्यास मिळतात आणि ही शिवलिंगे पूर्वी जशी होती तशीच आजही पाहायला मिळतात.
मंदिराचा परिसर
कुणकेश्वर मंदिराचा संपूर्ण परिसर हा प्रचंड मोठा आहे. मंदिराला एकूण 6 दरवाजे आहेत. मंदिराच्या परिसरामध्ये एक तलाव आहे, या तलावामध्ये सर्वत्र कमळाची फुले आणि मध्यभागी शंकराची मूर्ती पाहून मन प्रसन्न होते. शंकराच्या जटेतुन गंगा उत्पन्न झाल्याचा देखावा त्याठिकाणी उभा करण्यात आला आहे. मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात भव्य शिवलिंग आहे. मुख्य कुणकेश्वराच्या मंदिराबरोबरच इथे इतर देव-देवतांची मंदिरे देखील आहेत. या मंदिरांमध्ये जोगेश्वरी देवी मंदिर, समाधी मंदिर, भैरव मंदिर, श्री मंडलिक मंदिर, नारायण मंदिर, गणेश मंदिराचा समावेश होतो.
मुख्य मंदिरासमोर एक विशाल दीपस्तंभ आणि नंदीची मूर्ती पाहायला मिळते. कुणकेश्वर मंदिराचा सभामंडप फार मोठा आहे. मंदिराच्या सभामंडपाच्या भिंतींवर विविध देव-देवतांच्या सुंदर कोरीव मूर्ती पाहायला मिळतात.कुणकेश्वर मंदिरासमोर उजव्या आणि डाव्या बाजुला दोन पाषाण आहेत, त्या पाषाणांना चंड आणि मुंड असे म्हटले जाते. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना राहण्यासाठी भक्तनिवासची व्यवस्था केली आहे.
मंदिराचा इतिहास
देवगड मधील कुणकेश्वराचे हे मंदिर 1100 वर्षे जुने प्राचीन असल्याचे मानले जाते. या मंदिराचे बांधकाम अकराव्या शतकात यादव घराण्याकडून केले गेल्याचे बोलले जाते. सोळाव्या शतकात मुघलांच्या काळात औरंगजेबाचा पुत्र शाह आझम याने मंदिरावर आक्रमण करून मंदिर उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. शाह आझमकडून झालेल्या आक्रमणानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.
या मंदिराची उंची 70 ते 80 फूट इतकी आहे, तर मंदिराचे बांधकाम हे द्रविड शैलीमध्ये केल्याचे दिसून येते. अथांग पसरलेल्या समुद्र किनाऱ्यावर वसल्यामुळे कुणकेश्वर मंदिराची तटबंदी देखील तेवढीच भक्कम बांधण्यात आली आहे. मंदिराचा पाया ग्रेनाइट खडकाने बनविला आहे. कुणकेश्वर मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने केल्याचे स्पष्ट होते.
हेही वाचा :
भारतातून दुबईला जायला किती खर्च येतो, माहिती जाणून घ्या
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर, स्वराज्याचे रक्षक बहिर्जी नाईक कोण होते?
मंदिरातील प्रमुख उत्सव
भगवान शंकराचे मंदिर असल्याने या मंदिरात सर्वात मोठा साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे महाशिवरात्री. या मंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी 3 दिवसांची भव्य यात्रा याठिकाणी भरते. या यात्रेवेळी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी मंदिरात पाहायला मिळते.त्याचबरोबर मंदिरात गुढीपाडवा, मकरसंक्रांत, त्रिपुरी पौर्णिमा, श्रावणी सोमवार, अक्षय तृतीया यांसारखे हिंदू सण देखील मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.